छत्रपती शिवाजी महाराज जयंती साधेपणाने साजरी करा, राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
राज्यात कोविडचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे ३१ मार्चला तिथीनुसार साजरी केली जाणारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साधेपणाने यंदा साजरी करावी, असे आवाहन शासनाने केले आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
मुंबई -राज्यात कोविडचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे ३१ मार्चला तिथीनुसार साजरी केली जाणारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साधेपणाने यंदा साजरी करावी, असे आवाहन शासनाने केले आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
साधेपणाने शिवजयंती साजरी करा -
महाराष्ट्रात दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक आदी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड, किल्ल्यांवर जाऊन शिवजयंती साजरी करतात. मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन शासनाने केले आहे. तसेच शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगर पालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासनामार्फत नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ऑनलाइन प्रक्षेपण करा -
शिवप्रेमींनी या नियमांचे पालन करावे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करू नये. प्रभातफेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढू नयेत. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे केबल अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करावे, असे आवाहन शासनाने केले आहे.
त्रिसूत्रीचे पालन करावे -
शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छत्याबाबत जनजागृती करावी. आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे आणि मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, असेही अद्यादेश शासनाकडून काढण्यात आले आहेत.