मुंबई- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत १३ विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९९ गुण मिळविण्याचा विक्रम केला आहे. यंदाही देशभरातून वेगवेगळ्या विभागातून मुलींनीच आघाडी घेतल्याचे चित्र निकालातून समोर आले आहे.
सीबीएसई परीक्षेत एकूण ९१.१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत ४.४० टक्क्यांची वाढ झाली आहे. सीबीएसईच्या परीक्षेत देशात सिद्धांत पेंगोरिया प्रथम आला आहे. तर दिव्यांश वाधवा याने दुसरा क्रमांक पटकावला आहे. मागील काही अनेक वर्षात आघाडीवर असलेल्या चेन्नई विभागाला मागे ठेवत त्रिवेंद्रम विभागाने यावेळी बाजी मारली आहे. त्रिवेंद्रम विभागात ९९.८५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पहिल्या ९७ टॉपरपैकी मुंबईतील तिघेजण-
सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेत देशभरातील ९७ टॉपरपैकी चेन्नई विभागात मोडणाऱ्या मुंबईतील तिघांचा समावेश आहे. यात नेरुळ येथील एपीजे स्कूलचा दीपक पांडा, ठाण्यातील रिलायन्स फाऊंडेशन स्कूलचा धात्री मेहता आणि न्यू हॉरिझन स्कुलचा आंद्रे दास यांचा समावेश आहे.
गुवाहाटी विभागाचा सर्वात कमी निकाल -
सीबीएसईच्या दहावीला यंदा १७ लाख ६१ हजार ७८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १६ लाख ४ हजार ४२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात चेन्नई विभागाचा ९९ टक्के तर देवेंद्र विभागाचा ९९.८५ टक्के इतका निकाल लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा गुवाहाटी विभागाचा असून ७४.४९ टक्के निकाल लागला आहे. त्यानंतर दिल्लीचा समावेश आहे. दिल्ली विभागाचे ८०.९७टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर डेहराडून ८९.०४ असा निकाल लागला आहेत. पाटणा, भुवनेश्वर प्रयागराज, पंचकूला आणि अजमेर या विभागाचे निकाल हे नव्वदीपार पोहोचले आहेत.