मुंबई - राम मंदिराच्या मुद्द्यावरुन भाजप युवा मोर्चाने काढलेल्या मोर्चात मोठा राडा झाला. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांनाही शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी भाजपच्या माहीम विभाग अध्यक्षा अक्षता तेंडुलकर यांच्या तक्रारीनंतर शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह सहा शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी अक्षता तेंडुलकर यांनी शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना नाही तर सोनियांची सेना झाली, अशी टीका केली.
- सहा शिवसैनिकांवर गुन्हा दाखल -
भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण झाल्याप्रकरणी अक्षता तेंडुलकर यांच्या तक्रारीनंतर माहिम पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात माजी महापौर श्रद्धा जाधव, राजू पाटणकर, संजय देवळेकर, अक्षय तामोरे, चंदू झगडे, राकेश देशमुख आणि शकी फडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलन संपल्यानंतर आम्ही परत निघालो असताना काही शिवसैनिकांनी मागून येऊन हल्ला केला. आमदार सदा सरवणकर, श्रद्धा जाधव यांच्या सांगण्यावरुन शिवसैनिकांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप अक्षता तेंडुलकर यांनी केला आहे.
अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेकडून टीका करण्यात आली होती. शिवसेनेकडून घेण्यात आलेल्या भूमिकेविरोधात भाजप युवा मोर्चाकडून शिवसेना भवनच्या बाहेर आंदोलन करण्यात आले. दरम्यान, शिवसेना भवनच्या बाहेर भाजपचे आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्ते तिथे दाखल झाले. यादरम्यान शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले आणि तुफान हाणामारी झाली.