मुंबई -महानगरपालिकेच्या नगरसेविकेच्या विरोधात मुंबईतील बांगुर नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 20 मे रोजी बांगुर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक उपहारगृह चालवणाऱ्या व्यक्तीला मारहाण केल्याच्या संदर्भात हा गुन्हा बांगुर नगर पोलिसांनी दाखल केलेला आहे. महिला नगरसेविकेने या अगोदर उपहारगृह चालकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.
'नगरसेविकेने मारहाण करून रोकड चोरल्याचा आरोप' -
या प्रकरणातील तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार 20 मे रोजी बांगुर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या उपहार गुहामध्ये संध्याकाळच्या वेळेस तक्रारदार खाद्यपदार्थ विकत होता. यावेळी महिला नगरसेविका या ठिकाणी येऊन तिने ग्राहकांची हुज्जत घालण्यास सुरुवात केली होती. यावेळेस तिने एका ग्राहकाला मारहाण करत उपहारगृह चालकाच्या दुकानात शिरून त्या ठिकाणी पाहणी सुरू केली. मात्र, तिचा तोल जाऊन ती खाली पडल्यामुळे रागाच्या भरात तिने दुकानात असलेल्या एका प्लास्टिकच्या पाईप ने उपहारगृह चालकाला मारहाण केली. ज्यामध्ये त्याच्या नाकाला दुखापत झालेली आहे. याबरोबरच सदरच्या नगरसेविकेने तक्रारदाराच्या दुकानातील 28 हजार रुपयांची रोकड सुद्धा चोरलीअसल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.
'उपहार गृह चालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा' -
हा सर्व प्रकार झाल्यानंतर सदरच्या नगरसेविकेने उपाहारगृह चालकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यास पोलिसांकडून ताब्यात घेऊन तब्बल 5 दिवस बोरिवली लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. या नंतर त्यास न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जामिनावर त्याची 25 मे रोजी सुटका करण्यात आली होती. उपहारगृह चालकाने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी महिला नगरसेविकेच्या विरोधात कलम 452 , 324 , 504 , 506, 427 , 380 व 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.