मुंबई- राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य विस्तार पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. यासाठी आता 27 डिसेंबरची तारीख अंतिम करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर.. आज सायंकाळी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली. त्यासोबतच राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात बैठक पार पडल्याची माहिती एका वरिष्ठ सूत्राकडून समोर आली आहे.
या बैठकीत प्रामुख्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल एक तास बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या मंत्र्यांची यादी निश्चित झाली आहे. अद्याप काँग्रेसकडून याबाबत स्पष्टता नसल्याने उद्या होणार्या संभाव्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
राज्य मंत्रिमंडळाच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार हा उद्या होणार असल्याची बातमी होती. मात्र, आता हा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला असून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षाकडून 27 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठीचे एकमत होणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान रात्री उशिरापर्यंत काँग्रेसच्या हायकमांडकडून मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी नावे निश्चित करून त्याची यादी जाहीर केल्यास उद्या सायंकाळीही हा विस्तार होऊ शकतो असेही बोलले जात आहे.