महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अयोध्येत भव्य बुद्ध विहार उभारणार : रामदास आठवले

येत्या 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अयोध्येत राम मंदिराचा पायाभरणी समारंभ होत आहे. एकीकडे या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून वाद होत असतानाच आठवले यांनी त्याच परिसरात बुद्ध विहार बांधणार असल्याचे सांगत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

Union Minister and National President of the Republican Party Ramdas Athavale
केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले

By

Published : Jul 31, 2020, 1:56 AM IST

मुंबई - अयोध्येतील बहुचर्चित श्री राम मंदिराची पायाभरणी होण्याआधीच, त्याच परिसरात 30 एकर जागेवर भव्य बुद्ध विहार उभारणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून अयोध्या ओळखली गेली पाहिजे, असे मुंबईत त्यांनी सांगितले. येत्या 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अयोध्येत राम मंदिराचा पायाभरणी समारंभ होत आहे. एकीकडे या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरून वाद होत असतानाच आठवले यांनी त्याच परिसरात बुद्ध विहार बांधणार असल्याचे सांगत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची प्रतिक्रिया...

अयोध्येत ज्या प्रकारे राम जन्मभूमी असल्याचे काही पुरातन पुरावे सादर केले जातात. त्याच प्रकारे अयोध्येत ही प्राचीन काळात बुद्ध विहार असल्याचे अवशेष ही आढळून आले, असे आठवले यांचे म्हणणे आहे. 2 हजार 500 वर्षांपूर्वी भारत संपुर्ण बौद्ध राष्ट्र होते. अयोध्येत वादग्रस्त जागी राम मंदिराचे तसेच बुद्ध विहाराचे ही अवशेष सापडत आहेत हे सत्य आहे. बाबरी मस्जिद उभारण्या आधी तेथे राम मंदिर होते हे सत्य आहे. तसेच राम मंदिर उभारण्या आधी तेथे बुद्ध विहार होते हेही सत्य आहे. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत केले असून वाद मिटला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश समाजात कायम रहावा यासाठी अयोध्येत बुद्ध विहार होणे गरजेचे असल्याचे आठवले यांनी सांगितले.

हेही वाचा -राजस्थानातून चोरलेली 9 व्या शतकातील शिवमूर्ती लंडनहून मूळ स्थानी परतणार

अयोध्येत बुद्ध विहार बांधण्यासाठी बौद्ध बांधवांनी एकत्र यावे, असे आवाहन काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी केले होते. शिंदे यांच्या आवाहनाची राज्यभर चर्चा सुरू असताना आठवले यांनी याचा पुनरुच्चार केला आहे. मात्र, शिंदे यांच्या आधी दहा वर्षांपूर्वी बुद्ध विहार बांधण्याची मागणी केली असल्याचे आठवले यांनी सांगितले.

न्यायालयाच्या निवाड्याने अयोध्येत राम मंदिर बांधण्यात येत आहे. त्याच प्रकारे मशीद बांधण्याला ही न्यायालयाने परवानगी दिली आहे. याच भागात जर बौद्धकालीन विहाराचे अवशेष सापडले असतील तर त्या ठिकाणी बुद्ध विहार झाले पाहिजे. त्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहणार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. त्यासाठी उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांची भेट घेऊन सरकार कडून बुद्ध विहारासाठी जागा मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही त्यांनी सांगितले.

अयोध्येत बुद्ध विहार उभारण्यासाठी एका ट्रस्ट ची स्थापना करण्यात येईल. या ट्रस्टच्या माध्यमाने 30 एकर जमीन खरेदी करण्यात येईल. त्यानंतर बुद्ध विहार उभारण्याचा आमचा प्रयत्न असेल. सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून अयोध्या ओळखली जावी असाही आमचा प्रयत्न आहे, अशा भावना आठवले यांनी व्यक्त केल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details