कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण, दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण. पाटील यांनीच दिली माहिती. संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घेण्याची केली विनंती.
Breaking News : मुंबई पोलिसांकडून गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाईसह कंपनीच्या इतर 5 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - Maharashtra Top News
21:16 January 26
कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची लागण, दुसऱ्यांदा झाली कोरोनाची लागण
20:31 January 26
राज्यात रुग्ण संख्येपेक्षा बरे होणारे अधिक, दिवसभरात कोरोनाचे 39 हजार रुग्ण ठणठणीत; 35 हजार बाधित
मुंबई - राज्यात तरुणाचा रुग्ण संख्या दिवसेंदिवस चढ-उतार होत आहेत. आज 35 हजार बाधित आढळून आले असून 39 हजार रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. मृतांची संख्या 79 इतकी असल्याचा दावा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने केला आहे. ओमायक्रोनचा आज एकही रुग्ण आढळून आला नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
20:20 January 26
मुंबई क्राईम ब्रँच 'युनिट ११'कडून ७ कोटी रुपयांचे बनावट भारतीय चलन जप्त, ७ जणांस अटक
मुंबई - मुंबई क्राईम ब्रँच युनिट ११ ने बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. गुन्हे शाखा युनिट ११ ने ७ जणांसह ७ कोटी रुपयांचे बनावट भारतीय चलन जप्त केले. यावेळी लॅपटॉप, ७ फोन, रोख रक्कम, कार आणि सिमकार्डही जप्त करण्यात आले आहे.
19:58 January 26
नंदुरबारमध्ये बोलेरो- मोटारसायकलची धडक, एक जणांचा मृत्यू
नंदुरबार - शहादा-लोणखेडा बायपास रस्त्यावरील पाटीदार मंगल कार्यालयासमोर भीषण अपघात झाला. यात बोलेरो गाडी (क्र-MH-39-J-3790) व मोटार सायकल (क्रमांक MH- 39-P-8554) या दोन्ही वाहनानी समोरासमोर धडक दिल्याने मोटासायकलस्वार जागीच ठार झाल्याची भीषण घटना घडली. यात इतर सात जण जखमी झाले आहेत.
19:21 January 26
कोळश्याने भरलेला कंटेनर मजुराच्या झोपडीवर कोसळला, तीन सख्या बहिणींचा मृत्यू
ठाणे - कंटेनरमधुन कोळसा खाली करत असताना कंटेनरचा शॉक्बसर अचानक तुटला. यामुळे कोळश्याने भरलेल्या कंटेनर ट्रालीसहित कोळसा मजुराच्या झोपडीवर कोसळला. या भीषण अपघातात झोपेत असलेल्या तिघा सख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला. ही घटना भिवंडी तालुक्यातील टेंभिवली गावात असलेल्या विटभट्टीवर घडली. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली आहे. सुरेश पाटील असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. तर जागीच ठार झालेल्या बहिणी ७ वर्षीय ५ वर्षीय आणि ३ वर्षीय होत्या.
17:59 January 26
मुंबईत आजपासून ९१ निर्भया पथकांचे काम सुरू
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मुंबईत आज ९१ निर्भया पथके सुरू करण्यात आली. "पथकांमध्ये विशेष प्रशिक्षित महिला आणि पुरुष अधिकारी असतात जे संपूर्ण मुंबईत 24/7 तैनात असतात. त्वरित मदतीसाठी 103 वर डायल करू शकतो" अशी माहिती मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली.
17:26 January 26
बांद्र्यात एक चार मजली घर कोसळले, ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची भीती
मुंबई - बांद्र्यातील रजा मस्जिद जवळ एक चार मजली बांधकाम असलेले घर कोसळले आहे. दुपारी 3.55 च्या दरम्यान हे बांधकाम कोसळले असून त्याखाली 5 ते 6 जण अडकले असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाच्या 5 गाड्या व 1 रेस्क्यू व्हॅन दाखल झाली असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे.
17:08 January 26
पालघरमध्ये 1000 कोटींहून अधिकची बोगस बिले जारी केल्याबद्दल अकाउंटंटला अटक
पालघर - 1000 कोटींहून अधिकची बोगस बिले जारी केल्याबद्दल आणि 181 कोटी रुपयांची GST इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) फसवणूक केल्याबद्दल एका अकाउंटंटला अटक करण्यात आल्याची माहिती CGST पालघर आयुक्तालयाने दिली आहे.
17:04 January 26
मुंबई पोलिसांकडून गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाईसह कंपनीच्या इतर 5 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
मुंबई - न्यायालयाच्या निर्देशानुसार, मुंबई पोलिसांनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई आणि कंपनीच्या इतर 5 अधिकाऱ्यांवर कॉपीराइट कायद्याच्या उल्लंघनासाठी गुन्हा दाखल केला आहे. चित्रपट दिग्दर्शक सुनील दर्शनने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, गुगलने अनधिकृत व्यक्तींना त्यांचा चित्रपट 'एक हसीना थी एक दिवाना था' यूट्यूबवर अपलोड करण्याची परवानगी दिली.
16:01 January 26
टिपू सुलतान क्रीडांगण नामकरण वाद चिघळण्याची चिन्हे, परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मुंबई -टिपू सुलतान क्रीडांगण नामकरणाचा वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. मुंबईतील मालाडमध्ये टिपू सुलतान क्रीडांगणचे उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी भाजपचे आंदोलन पाहता अथर्व कॉलेजजवळ मुंबई पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मालाड अथर्व कॉलेज ते टिपू सुलतान मैदानापर्यंत मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. भाजपचे कार्यकर्ते अथर्व कॉलेजमध्ये जमणार असून मालाडच्या टिपू सुलतान मैदानावर जाणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
14:50 January 26
श्रीमंतांच्या यादीत अदानींनी अंबानींना टाकले मागे
जागतिक श्रीमंतांच्या यादीत अदानी समूहाने अंबानी यांना मागे टाकत वरचा क्रमांक पटकावला आहे. कमाईच्या बाबतीत अदानी आता ११ व्या स्थानावर पोहोचले आहेत. रिलायन्स शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम अंबानींना भोगावा लागला आहे.
13:33 January 26
Breaking News : प्रजासत्ताक दिन सोहळ्याला गालबोट, राज्यात तीन ठिकाणी आत्मदहनाचे प्रयत्न
मुंबई - प्रजासत्ताक दिन सोहळ्याला राज्यात तीन ठिकाणी गालबोट लागले आहे. प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करताना बीड, हिंगोली, सातारा या ठिकाणी विविध मागण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न झाला. यात हिंगोली येथील तरुण गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्महदनाचा प्रयत्न
हिंगोली- येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका भारतीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्याने अंगावर डिझेल ओतून प्रजासत्ताक दिनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी मदत झाली आहे. मिलिंद प्रधान असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याने कायद्याचा दुरुपयोग करून शासकीय महसूल बुडवला तसेच तुकडे बंदी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी सेनगाव येथील अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केलेली आहे. मात्र त्या मागणीकडे अजून लक्ष न दिल्याने प्रधान याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
साताऱ्यात ज्योती नलावडेने केला आत्मदहनाचा प्रयत्न
सातारा - जावली बँकेत घोटाळा झाल्याचा आरोप करत ज्योती नलावडे या महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. ज्योती नलावडे या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोरोना काळात पुरवले बेड, बील न मिळाल्याने तरुणाने केला आत्मदहनाचा प्रयत्न
बीड - ध्वजारोहणानंतर धारुर येथील तहसील कार्यालयात तरुणाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. पवन तट असे त्या तरुणाचे नाव आहे. पवन याचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. कोरोना काळात रुग्णांना बेड, बेडशीट पुरवले होते. मात्र बील न मिळाल्यामुळे त्याने आत्मदहनाचा इशारा दिला होता.
13:21 January 26
Breaking News : मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे नामर्द आहेत - संजय राऊत
मुंबई - मुख्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीमुळे राज्यात उत्साह संचारला आहे. विरोधकांच्या हृदयातील कचरा बाहेर पडत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे नामर्द आहेत. नामर्द हा शब्द भाजपनेच आणल्याची टीका संजय राऊत यांनी केली.
उठसुठ कोणालाही पुरस्कार दिले जातात. वीर सावरकर यांना पुरस्कार द्याल असे वाटले होते. पण सावरकर अजूनही भारतरत्न पुरस्कारापासून वंचित आहेत.
12:23 January 26
Breaking News : सत्तुराने सपासप वार करून पतीकडून पत्नीची हत्या; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ समोर
कोल्हापूर - वारंवार दारू पिऊन त्रास देणाऱ्या पतीसोबत राहण्यासाठी नकार देणाऱ्या पत्नीचा पतीने सत्तुराने सपासप वार वरून निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना कोल्हापुरातील हुपरी येथे घडली आहे. समिना इम्तियाज नदाफ (वय 28) असे मृत पत्नीचे नाव असून इम्तियाज राजू नदाफ (वय 32) असे पतीचे नाव आहे. दरम्यान, अंगावर काटा आणणाऱ्या घटनेचा व्हिडिओ सुद्धा समोर आला असून पोलिसांनी या निर्दयी पतीला अटक केली आहे.
12:19 January 26
Breaking News : धक्कादायक; मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वाजे यांचा मृतदेह आढळला जळालेल्या अवस्थेत
नाशिक - महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. डॉ. सुवर्णा वाजे असे त्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. वाजे या सिडको येथील मनपाच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
विल्होळी परिसरातील चारचाकी वाहनात पूर्ण जळालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून पोलीस तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. डॉ. वाजे यांचा घातपात झाला की अन्य काही कारणाने ही घटना घडली, याबाबत पोलीस तपास करत आहे.
10:56 January 26
Breaking News : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते आज शिवाजी पार्कवर ध्वजारोहण पार पडले. यावेळी राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची भेट घेतली. मात्र
10:46 January 26
Breaking News : साकिनाक्यात गॅस लिकेजमुळे आग, ३ जण जखमी
मुंबई - अंधेरी पूर्व साकिनाका काजू पाडा नेताजी नगर येथील जैन सोसायटीमध्ये सकाळी ८ च्या सुमारास गॅस लिकेज होऊन आग लागली. या आगीत हकीम खान (५० वर्षे), सोहेल खान (२४ वर्षे), सहिम अन्सारी (३४ वर्षे) हे ३ जण जखमी झाले. त्यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आग ८.४५ वाजता विझवण्यात अग्निशमन दलाला यश आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
10:31 January 26
Breaking News : 11 सप्टेंबरला मांडणार राज्याचा अर्थसंकल्प - अजित पवार
मुंबई - 11 सप्टेंबरला राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. मात्र त्याआधी केंद्र सरकारकडून अर्थसंकल्प मांडण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महाराष्ट्रातील 51 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले.
जी एसटीच्या स्वरुपात जे पैसै केंद्र सरकार राज्यांना देत होते, ते यावर्षीपासून बंद करण्यात येणार आहेत. कारण सुरुवातीची पाच वर्षे हे पैसे द्यायचे असे ठरले होते. पण कोरोनाकाळात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हे पैसै आणखी दोन वर्षे द्यावेत अशी आमची मागणी आहे. त्यासाठी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्याच्या उपस्थितीत उद्या बैठक घेण्याचा विचार आहे. मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
सायरस पुनावाला, सुलोचना चव्हाण आणि इतरांना पद्म पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही अजित पवार यांनी केले.
09:48 January 26
Breaking News : राज्यपाल भगतसिंग कोशारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर दाखल
मुंबई - राज्यपाल भगतसिंग कोशारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवाजी पार्कवर दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा होत आहे. यावेळी पालकमंत्री अस्लम शेख ही उपस्थित आहेत.
08:49 January 26
Breaking News : महापौरांकडून महापालिका मुख्यालय, महापौर बंगला येथे ध्वजारोहण
मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई महापालिका मुख्यालय तसेच महापौरांचे शासकीय निवासस्थान असलेल्या राणीबागेतील महापौर बंगल्यात महापौर किशोरी पेडणेकर यांनी ध्वजारोहण केले. मुंबई महापालिका मुख्यालय येथे ध्वजारोहणाप्रसंगी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त आदी मान्यवर उपस्थित होते. तर महापौर बंगल्यावर महापौरांनी आपले कुटूंबीय आणि बंगल्यातील कर्मचाऱ्यांच्या उपास्थित ध्वजारोहण केले.
08:46 January 26
Breaking News : वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण, नागरिकांना दिल्या शुभेच्छा
मुंबई - भारतीय प्रजासत्ताकाच्या वर्धापनदिन निमित्ताने वर्षा निवासस्थानच्या प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे तसेच राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला सलामीसह मानवंदना दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपस्थितांना शुभेच्छाही दिल्या.
08:39 January 26
Breaking News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयात ध्वजारोहण
नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर जिल्हा मुख्यालयात महानगर संघचालक राजेश लोहिया यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. कोरोना नियमाचे पालन करुन यावेळी ध्वजारोहण सोहळा पार पडला.
08:37 January 26
Breaking News : शरद पवारांच्या प्रकृतीसाठी बाप्पाला साकडं
पुणे - शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी पुण्यात बाप्पाच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी आरती गायली.
07:27 January 26
मुंबईत पोलिसांचा तगडा बंदोबस्त, नाकाबंदीवर वाहनांची तपासणी
मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तगडी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस दलाचे जवान शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी करत आहेत. मुंबईतील विविध भागात पोलिसांनी नाकाबंदी करुन तपासणी सुरू केली आहे. दक्षिण मुंबईतील जे.जे उड्डाणपुलावर तर रात्रीपासून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.