मुंबई- आपले वेगळे अस्तित्व तयार करण्यासाठी जगभरात लोक काहीही करताना पाहायला मिळतात. आपली वेगळी ओळख असावी, लोकांनी त्यासाठी आपल्याला ओळखावे, अशी इच्छा अनेकांची असते. ती इच्छा घेऊन उत्तर प्रदेशमधून मुंबईत आलेला गोल्डन बॉय ( Golden Boy ) सध्या चांगलाच चर्चेत आहे. चर्चगेट स्टेशन परिसरात आपल्या संपूर्ण अंगाला सोनेरी रंग लावून एखाद्या पुतळ्या प्रमाणे उभे राहण्याची कला नूर आलम या तरुणाने चांगलीच आत्मसात केली आहे. संपूर्ण अंगावर सोनेरी रंग थापून गोल्डन बॉयच्या रूपात तयार होऊन रस्त्याच्या लगत किंवा फुटपाथवर पुतळ्या प्रमाणे जेव्हा नूर उभा राहतो. त्यावेळेस येणारे जाणारे प्रत्येक जण त्याच्याकडे कुतुहलाने पाहतात. एवढेच काय तर, अनेकांना त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही. नूरच्या या आगळ्यावेगळ्या रूपाला पाहून अनेक जण त्याला आर्थिक मदतही करतात.
...म्हणून झालो गोल्डन बॉय -नूर आलम हा उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्यातील मोहना या गावचा रहिवाशी आहे. मात्र, घरी असलेल्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांनी वयाच्या 20 व्या वर्षी मुंबईत येण्याचा निश्चय केला. मुंबईत कोणतेही नातेवाईक किंवा निकटवर्तीय नसतानाही केवळ प्रवासात मिळालेल्या मित्रांच्या आशेवर धारावीमध्ये आला. तिथे आपल्या मित्रांच्या ओळखीवर तात्पुरते काम मिळवले. मात्र, त्या कामापासून होणाऱ्या मिळकतीत स्वतःला पुरेल इतकेही पैसे मिळत नव्हते. त्यामूळे या काममुळे आपली उपजीविका होणार नाही. आपल्याला काहीतरी वेगळे करावे लागेल, असा निश्चय नूर आलमने केला. मात्र, नेमके काय करावे हे त्याला सुचत नव्हते. एकेदिवशी इंटरनेट सर्च करत असताना गोल्डन बाय बनण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. त्यानंतर 31 डिसेंबर, 2021 च्या रात्री पहिल्यांदा नूर हा गोल्डन बॉय झाला. त्या दिवसांपासून नेहमी गोल्डन बॉयच्या वेशामध्ये तो मुंबईतील चर्चगेट परिसरामध्ये वावरत असतो. तिथे येणारे देशी-परदेशी पर्यटक कुतूहलाने नूर सोबत बोलतात. त्याच्या सोबत फोटो काढतात. यातून आता नूरची चांगली कमाई होत आहे. आपल्या आवडीच्या कामातून मिळकत मिळत असल्याने नूर ला ही या कामात आता मोठा आनंद मिळत आहे.