मुंबई- अभिनेत्री कंगना रणौतच्या वांद्रे पाली हिलस्थित कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने 9 सप्टेंबर रोजी अतिक्रमण केल्याच्या कारणावरून तोडक कारवाई केली होती. याविरोधात तब्बल 2 कोटींची नुकसान भरपाई मिळावी म्हणून अभिनेत्री कंगनाकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. यात शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रतिवादी करण्याची परवानगी उच्च न्यायालयाने कंगनाला दिली आहे.
कंगना हिने उच्च न्यायालयात एक सीडी सादर केली असून यामध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘उखाड देंगे’ व ‘उखाड दिया’ अशा भाषांचा वापर करून मला धमकावण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे. यावर मुंबई महानगरपालिकेच्या एच- वेस्ट वॉर्डच्या सत्यवान लाते या अधिकाऱ्याला व शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रतिवादी बनवण्याची अनुमती कंगनाला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. जे काथावाला व न्यायमूर्ती आर. आई छागला यांच्या खंडपीठाने दिली आहे.
कंगनाच्या याचिकेत संजय राऊत यांना प्रतिवादी करण्यास न्यायालयाची परवानगी - kangana petition bomby high court
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हीने मुंबई पोलीस आणि शहराबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यातच मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या मणिकर्णिका कार्यालयावर तोडक कारवाई केली. ही कारवाई सूडबुद्धीने केली असल्याचे म्हणत कंगनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
संग्रहित छायाचित्र
कंगनाच्या वकिलांतर्फे न्यायालयात म्हणण्यात आले होते की, 8 सप्टेंबर रोजी कंगना व फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या घरातील बांधकामावरून त्यांना महापालिकेने नोटीस बजावली होती. मात्र, कंगनाला प्राप्त झालेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी 24 तास देण्यात आले तर, मनीष मल्होत्रा यास 7 दिवसांचा अवधी देण्यात आला होता. यावरून स्पष्ट होतो की, सूडबुद्धीने कंगनाच्या कार्यालयावर तोडक कारवाई करण्यात आली होती.