मुंबई -मुंबईत म्हाडा (MHADA)च्या अनेक वस्ती आहेत. या वसाहतींमध्ये मलनिःसारण वाहिन्या, जलवाहिन्या जोडणी, रस्त्यांची दुरुस्ती आदींसाठी नागरिकांना पाठपुरावा कुठे करायचा, हा प्रश्न होता. मात्र आता यावर तोडगा काढण्यात आला आहे. यासर्व सुविधा यापुढे मुंबई महानगरपालिके(BMC)तर्फे पुरविण्यात येतील, अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली आहे.
सुविधा पुरविण्याचा उद्देश
म्हाडा मुख्यालयात आमदार, खासदार, म्हाडा आणि महापालिकेचे अधिकारी यांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. म्हाडा मुख्यालयात शहरातील म्हाडा वसाहतींमध्ये सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने म्हाडा व महापालिकेचे अधिकारी यांची सकाळी बैठक झाली. या बैठकीला महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar), खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant), खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar), म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे, मुंबई इमारत व दुरुस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी अरुण डोंगरे आदी उपस्थित होते.