मुंबई - आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी गेल्याच्या आरोपामुळे कोठडीत असलेला कल्याणमधील संशयित दहशतवादी तरुण अरीब मजीदला अखेर मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. आयएसआयएस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेत सामिल होऊन दहशतवादी कारवाया केल्याचा मजीदवर आरोप आहे.
जामीनासाठीच्या शर्ती -
1 लाखाचा जामीन
कल्याणमधील राहतं घर सोडण्यास मनाई
पहिले दोन महिने दिवसांतून दोनदा, सकाळी आणि संध्याकाळी पोलीस स्टेशनला हजेरी लावणं बंधनकारक
पासपोर्ट तात्काळ एनआयएकडे जमा करण्याचे निर्देश
आंतरराष्ट्रीय फोनकॉल करण्यासही मनाई
जवळपास सहा वर्ष आणि तीन महिन्यांनंतर अरीबची जामीनावर सुटका होणार आहे. एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि हमीदार देण्याच्या अटीवर अरीबला जामीन देण्यात आला आहे.
अरीब मजीदच्या जामिनाला एनआयएने दिलेलं आव्हान हायकोर्टानं फेटाळलं. मजीदला दिलेला जामीन योग्यच आहे, असे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे.
अरीबविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) या दहशतवादविरोधी कायद्याखाली २०१४मध्ये गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर त्याने जामिनासाठी केलेले अर्ज एनआयए न्यायालयाने व उच्च न्यायालयानेही फेटाळले होते. १७ मार्च २०२० रोजी विशेष एनआयए कोर्टाने अरीब मजीदला जामीन मंजूर केला होता, मात्र, एनआयएने या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान द्यायची इच्छा व्यक्त करून आदेश तूर्त स्थगित करण्याची विनंती केली होती.
इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असलेला अरीब हा तीन मित्रांसह २३ मे २०१४ रोजी यात्रेकरूंच्या गटातून इराकमध्ये गेला होता. त्यानंतर तो आयएसआयएस या दहशतवादी संघटनेत सामील झाला, असा आरोप आहे. २८ नोव्हेंबर २०१४ रोजी तो तुर्कस्तानहून मुंबईत परतताच त्याला अटक करण्यात आली. तेव्हापासून तो कोठडीतच होता.