मुंबई : एखाद्या महिलेने मैत्री केली ( friendship with woman ) असेल तर त्याचा अर्थ तिने त्या पुरुष मित्राला शरीरसंबंध ठेवण्यास परवानगी दिली असे नाही, असा स्पष्ट निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने ( Bombay High Court ) दिला आहे. अशाच एका प्रकरणात न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळून लावला आहे.
२२ वर्षीय तरुणीचा आरोप :या प्रकरणात तक्रारदार ही २२ वर्षीय तरुणी असून, ती आरोपीच्या ओळखीची होती. 2019 मध्ये ती मैत्रिणीसोबत मैत्रिणीच्या घरी गेली असता आरोपीने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर तरुणीने यावर आक्षेप घेतल्यानंतर आरोपीने तिला पसंत असून, तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले. यानंतर आरोपीने अनेकवेळा तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
तक्रारीत म्हटलंय :पीडितेने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, आरोपीने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर आरोपीने अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले. मात्र पीडिता 6 आठवड्यांची गरोदर राहिल्यानंतर तिने आरोपीशी संपर्क साधला. मात्र आरोपीने मुलाची जबाबदारी घेण्यास नकार दिला. एवढेच नाही तर आरोपीने मुलीच्या चारित्र्यावरही प्रश्न उपस्थित केले. ती दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा आरोप केला. मुलीने फिर्यादीत म्हटले आहे की, तिने आरोपींकडे लग्नासाठी वारंवार विनवणी केली, मात्र आरोपीने ऐकले नाही.
सन्मानाची अपेक्षा :प्रत्येक स्त्रीला नातेसंबंधात 'सन्मान' अपेक्षित असतो, जरी ती परस्पर स्नेहावर आधारित असली तरी. मात्र या प्रकरणात आरोपीने आधी मैत्री केली, नंतर लग्नाच्या बहाण्याने अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले, फिर्यादी गर्भवती राहिल्यावर आरोपीने तिच्यावर गंभीर आरोप केले, असे उच्च न्यायालयाने एका पुरुषाने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना म्हटले. निकाल देताना न्यायाधीश डांगरे म्हणाले की, सध्या स्त्री-पुरुष एकत्र काम करत असताना त्यांच्यात मैत्री होण्याची, जवळीक वाढण्याची किंवा दोघांचे विचार एकत्र येण्याची शक्यता असते. पण मैत्रीचा अर्थ असा नाही की स्त्री त्या पुरुषाला शारीरिक संबंध ठेवू देते.