मुंबई -मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) एक अनोखी घटना घडली आहे. आरोपींना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायालयाने थेट वकिलाच दंड (Bombay High Court fined ) ठोठावला आहे. बलात्काराचा खटला रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेसोबत आक्षेपार्ह छायाचित्रे जोडल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने एका वकिलाला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला. वकिलाने याचिकेसोबत अत्यंत आक्षेपार्ह छायाचित्रे जोडताना विवेकबुद्धीचा वापर केलेला नाही, अशा शब्दात न्यायालयाने वकिलांना खडेबोल सुनावले आहे.
काय आहे प्रकरण- पतीवरील बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी पत्नीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये पीडितेबाबत माहिती देताना काही अनावश्यक आणि अत्यंत आक्षेपार्ह छायाचित्रे याचिकेत दाखल ( attached Offensive photo ) केली होती. न्यायालयात वकिलाने ती आक्षेपार्ह चित्र याचिकेसोबत सादर केली असता न्यायालयाने वकिलाला हा दंड ठोठावला आहे.
न्यायालयाने काय म्हटले- आरोपीच्या पत्नीने पती विरोधातील बलात्काराचा गुन्हा आणि आरोपपत्र रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्या याचिकेवर न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या आदेशाची प्रत मंगळवारी जाहीर करण्यात आली.सुनावणीदरम्यान याचिकेसोबत जोडण्यात आलेली छायाचित्रे निदर्शनास आल्यानंतर खंडपीठाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना जाब विचारला. अशी छायाचित्रे जोडणे हे पक्षकारांच्या गोपनीयतेवर हल्ला असल्याचे खंडपीठाने नमूद केले आणि वकिलांना याचिकेमधून फोटो तत्काळ काढून टाकण्याचे निर्देश दिले.
वकिलाला 25 हजारांचा दंड - वकिलाने न्यायलयात गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेसोबतच आक्षेपार्ह फोटो जोडल्यामुळे न्यायलयाने नाराजी व्यक्त केली. तसेच यापुढे सर्व वकिलांनी अशी आक्षेपार्ह छायाचित्रे याचिकेसोबत जोडताना आपल्या विवेकबुद्धीचा वापर करतील अपेक्षा करतो असेही न्यायालयाने नमूद केले आणि वकिलाला या असभ्य वर्तनासाठी 25 हजार रुपये दंडरुपी किर्तीकर लॉ लायब्ररीकडे दोन आठवड्यांत जमा करण्याचे निर्देश दिले.