मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने बॉलीवूड अभिनेता सूदची याचिका फेटाळली आहे. जुहू येथील एक सहा मजली रहिवासी इमारतीत बीएमसीच्या परवानगीशिवाय एका हॉटेलमध्ये रुपांतरीत केल्याचा आरोप सोनूवर आहे. या प्रकरणी एमआरटीपी कायद्याअंतर्गत बीएमसीने तक्रार दाखल केली आहे. मात्र, आपण बेकायदेशीर बांधकाम केले नसून इमारतीवर कारवाई होऊ नये, अशी याचिका त्याने उच्च न्यायालयात केली होती. मात्र, ही याचिका फेटाळण्यात आली आहे.
न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर सुनावणी -
सोनू सूद याच्या जुहू परिसरातील शक्ती सागर या 6 मजली इमारतीमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात मुंबई महापालिकेने कारवाई केल्यानंतर यासंदर्भात सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर याची सुनावणी झाली असता दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने या याचिकेवरील निकाल देत अभिनेता सोनू सूद याची याचिका फेटाळून लावली आहे.
मुंबई महानगर पालिकेचा युक्तीवाद -
अभिनेता सोनू सूद हा सवयीचा अपराधी म्हणजेच हॅबिच्युअल ऑफेंडर असल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून आरोप करण्यात आलेला आहे. या आगोदर सोनू सूद ला 2018 मध्ये नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र, हा वाद सत्र न्यायालयात गेल्यावर सत्र न्यायालयानेही सोनू सूदच्या विरोधात निकाल दिला असल्याचा दाखला मुंबई महानगर पालिकेने उच्च न्यायालयात दिला होता.
काय म्हणाला सोनू सूद
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांच्या मुंबईतील शक्ती सागर या मालकीच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी पालिकेकडून कारवाई केल्यानंतर याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सूदने याचिका दाखल केली होती. मुंबई महानगरपालिकेने माझ्यावर केलेली कारवाई ही भेदभावपूर्ण असून 1992 साली बांधण्यात आलेली शक्ती सागर ही सहा मजली इमारत मी 2018 मध्ये आहे त्या परिस्थितीत घेतली होती. या दरम्यान कुठल्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम केले नसल्याचा दावा सोनू सूदने बुधवारी (दि. 13 जाने.) झालेल्या सुनावणीत केला होता.