मुंबई - बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक मुश्ताक नाडियादवाला यांची पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलांना पाकिस्तानमधील पत्नीच्या कुटुंबीयांनी बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवले आहे. त्यांना भारतात आणण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यामध्ये नाडियादवाला यांच्या कुटुंबीयांना शोधण्याकरिता केंद्रीय परराष्ट्र विभागाने पुढाकार घ्यावा तसेच त्यांना शोधण्याकरिता याचिकाकर्त्याला या ठिकाणावरून त्या ठिकाणी हेलपाटे घालायला लावू नका असे मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय परराष्ट्र विभागाला म्हटले आहे.
उच्च न्यायालयाने म्हटले आहे की MEA ने या प्रकरणाला प्रतिकूल मानू नये. तसेच यामध्ये सहकार्य करायला पाहिजे आणि समस्येचे निराकरण झाले की नाही याची खात्री देखील करायला पाहिजे. संबंधित अधिकाऱ्याने याचिकाकर्त्याला उत्तर का दिले नाही? याचिकाकर्त्याला MEA मध्येच एका एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी का हेलपाटे घालावे लागत आहेत, असे देखील कोर्टाने म्हटले आहे. फक्त फोन उचला आणि संबंधित अधिकाऱ्याशी बोला आणि मुले कुठे आहेत ते पहा असेही कोर्टाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती डेरे म्हणाल्या किमान काही संपर्क क्रमांक किंवा ईमेल शोधा जेणेकरून याचिकाकर्ता नाडियाडवाला आणि त्यांच्या मुलांमध्ये संवाद साधता येईल. MEA ला याचिकेला प्रतिसाद देण्याचे आणि योग्य पावले उचलण्याचे निर्देश दिले. या प्रकरणावर पुढील सुनावणी 21 सप्टेंबर पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पी के चव्हाण यांच्या खंडपीठासमोर नाडियादवाला यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. ज्यात त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांचे सुरक्षित परत येण्यासाठी सरकारला निर्देश द्यावेत, असे म्हटले होते. उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाला या याचिकेला उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. MEA च्या मुख्य पासपोर्ट आणि व्हिसा कार्यालयातील अधिकाऱ्याला नाडियादवाला यांना भेटण्याचे निर्देश दिले होते.