मुंबई -शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना महिलेने छळ केल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि पतीच्या सांगण्यावरून छळ केल्याची याचिका 39 वर्षीय महिलेने उच्च न्यायालयात दाखल केली होती.
याचिकाकर्ती महिला ही मुंबईची रहिवाशी आहे. 2013 आणि 2018 मध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात दाखल केलेल्या तीन तक्रारीप्रकरणी तपास करावा, अशी याचिका महिलेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.
हेही वाचा-Narayan Rane Case : नारायण राणेंना 17 सप्टेंबरपर्यंत हायकोर्टाचा दिलासा
तपास करण्याची गरज नसल्याचे सरकारकडून युक्तीवाद
मुंबई उच्च न्यायालयाच्या पीठाचे न्यायाधीश एस. एस. शिंदे आणि न्यायाधीश एन. जे. जमादार यांनी महिलेची याचिका 22 जुलैला राखीव ठेवली होती. पोलिसांकडून मिळणाऱ्या ए- समरी रिपोर्टप्रमाणे योग्य कायदेशीर प्रक्रिया करण्याचे न्यायालयाने आदेश दिले होते. महिलेच्यावतीने आभा सिंह यांनी न्यायालयात बाजू मांडली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे झोन 8 च्या डीसीपींनी महिलेच्या तक्रारीवर कारवाई केली नसल्याचे आभा सिंह यांनी युक्तीवादात म्हटले. सरकारच्यावतीने अरुणा पै यांनी युक्तीवादात म्हटले , की एका प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तर दोन प्रकरणात ए समरी रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तपास करण्याची गरज नाही.