मुंबई - कुठलाही छोटा-मोठा आजार असो, अनेकदा आजाराचे अचूक आणि योग्य निदान होण्यासाठी रुग्णांच्या विविध वैद्यकीय चाचण्या होणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे पॅथॉलॉजी लॅब आणि पॅथॉलॉजिस्ट महत्त्वाचे ठरतात. आरोग्य व्यवस्थेतील इतक्या महत्त्वाच्या घटकाकडे मात्र आरोग्य यंत्रणा आणि संबंधित यंत्रणा गंभीर्याने पाहत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. त्यामुळेच गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यात बोगस पॅथॉलॉजी लॅब आणि बोगस पॅथॉलॉजिस्टचा सुळसुळाट आहे.
राज्यात आजच्या घडीला 13 हजारापैकी सुमारे 8 हजार बोगस पॅथॉलॉजी लॅब्स कार्यरत आहेत. या बोगस लॅब आणि त्यातील बोगस पॅथॉलॉजिस्ट, बोगस तंत्रज्ञ वर्षानुवर्षे रुग्णांची आर्थिक लूट, फसवणूक करत असून त्यांच्या जीवाशी खेळ करत आहेत. पण राज्य सरकार आणि या बोगस लॅबविरोधात कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणा डोळ्यावर पट्टी बांधून आहेत. त्यामुळे अशा बोगस लोकांचे फावत असल्याचे म्हणत महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेने यावर नाराजी व्यक्त केली.
राज्यात आठ हजार बोगस पॅथॉलॉजी लॅब्स, वर्षानुवर्षे रुग्णांच्या जिवाशी खेळ लॅबसाठी ना नियम ना नोंदणी, सगळा आंधळा कारभारताप, सर्दी खोकला असो वा कर्करोगासारखे मोठे जीवघेणे आजार, अशावेळी अनेक प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या रुग्णांना कराव्या लागतात. रुग्णालयात पॅथॉलॉजी लॅब असतात. तर इतर ठिकाणी लॅब असतात. पण या लॅब सुरू करण्यासाठी कोणतेही नियम नाहीत की, यासाठी कोणत्याही यंत्रणेकडून परवानगी घेण्याची,नोंदणीची गरज नाही. त्यामुळे ज्याला वाटेल तो लॅब सुरू करू शकतो. फक्त लॅबमध्ये चाचणी करण्यासाठी तसेच चाचणी अहवालावर सही करण्यासाठी अधिकृत, नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्ट आवश्यक असतो. महाराष्ट्र राज्य मेडिकल कौन्सिलकडे नोंदणीकृत एमडी पॅथॉलॉजिस्ट असणे यासाठी बंधनकारक आहे. पण लॅबसाठीच कुणाच्या परवानगीची गरज नसल्याने लॅबमध्ये नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्ट आहे की नाही हे तपासणारी यंत्रणाच नाही. त्यामुळे बोगस लॅब चालवणाऱ्यांचे फावत आहे. त्यामुळे राज्यात बोगस लॅब आणि बोगस पॅथॉलॉजिस्टचा सुळसुळाट असल्याचा आरोप संघटनेकडून केला जात आहे.
हेही वाचा -कापूस खरेदीत गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांनी शिकवला धडा; वसूल केले 51 हजार रुपये
सुमारे आठ हजार बोगस लॅब असल्याचे सरकारकडून सभागृहात मान्य!
पॅथॉलॉजिस्ट लॅब उठ-सूठ कुणी ही टाकू शकते. यावर निर्बंध आणत नियमाच्या, कायद्याच्या कक्षेत लॅबला आणणे गरजेचे आहे. जेणेकरून रुग्णांची आर्थिक लूट आणि त्यांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबेल. तर त्याचवेळी लॅबमध्ये नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्ट आहे का, याचीही तपासणी होत नाही. त्यामुळे सगळा आंधळा कारभार सुरू असून बोगस लॅबचा राज्यात सुळसुळाट असल्याचा आरोप महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी केला आहे. तर, आजच्या घडीला राज्यात सुमारे आठ हजार बोगस लॅब असून आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेतून ही बाब पुढे आणली आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्य सरकारने काही वर्षांपूर्वीच राज्यात आठ हजार बोगस लॅब असल्याचे थेट सभागृहात मान्य केले असल्याचेही डॉ. यादव यांनी सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला हरताळ
बोगस लॅब आणि बोगस पॅथॉलॉजिस्टचा विषय उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2017 मध्ये लॅबमधील सर्व चाचण्या या नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्टकडूनच व्हायला हव्यात, लॅब मध्ये नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्ट असायलाच हवा आणि चाचणी अहवालावर त्याची सही असणे आवश्यक आहे. पण या आदेशाचे पालन राज्यात कुठेही होताना दिसत नाही. त्यामुळेच आज 13 हजारापैकी 8 हजार लॅब या नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्ट शिवाय चालतात. म्हणजेच या लॅब अनधिकृत बोगस आहेत. या अशा लॅबमुळे निदान योग्य होत नाही, गरज नसताना रुग्णांच्या चाचण्या करत त्यांची आर्थिक लूट होते, चुकीच्या निदानामुळे रुग्णांना जीव ही गमवावा लागल्याच्या घटना घडल्याचेही डॉ. यादव यांनी सांगितले आहे.
फेरीवाल्यांप्रमाणे लॅबचा सर्व्हे करा
बोगस पॅथॉलॉजिस्ट आणि बोगस लॅब विरोधात कारवाई नेमकी कुणी कारवाई करायची हा मोठ्या प्रश्न आहे. कारण याचे ठोस उत्तर अद्याप नाही. असे असले तरी बोगस डॉक्टर शोध समितीला या विरोधात कारवाई करण्याचा अधिकार आहे. म्हणजेच पालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थाही याविरोधात कारवाई करत या लॅब बंद करू शकतात. पण असे होताना दिसत नाही. त्यामुळेच गेली 14 वर्षे आम्ही बोगस लॅब बंद कराव्यात यासाठी सरकारी स्तरावर पाठपुरावा करत आहोत. पण सरकार काही केल्या लक्ष द्यायला तयार नसून याबाबत सरकार प्रचंड उदासीन असल्याचे चित्र असून यामुळेच बोगस लॅबवाल्यांचे फावत असल्याचेही डॉ यादव यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान मुंबईत मुंबई महानगर पालिकेकडून फेरीवाल्यांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. तसे सर्व्हेक्षण पालिकेने लॅबचेही करावे आणि बोगस लॅब चालवणाऱ्याच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी संघटनेची आहे. दरम्यान रुग्णांनी, नागरिकांचीही याबाबत मोठी जबाबदारी आहे. त्यांनी नोंदणीकृत पॅथॉलॉजिस्टकडेच जाऊन चाचण्या करणे गरजेचे आहे असे आव्हान ही डॉ. यादव यांनी केले आहे.
हेही वाचा -धारावीतील शिवसैनिकही आता आक्रमक, पुनर्विकास मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांना साकडे