मुंबई-महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय उलथापालत सुरू आहे..त्याचे पडसाद आता गृहविभागवरही पहायला मिळत आहेत. गृहविभागवर गृहमंत्र्यांची पकड नाही का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी रातोरात शिवसेनेचे अनेक बंडखोर आमदार घेऊन सुरत गाठले. मात्र यावर गृहविभागाकडून काही कारवाई करण्यात आली नाही. त्यात आता आणखी नवी माहिती समोर येतेय..संबंधित मंत्र्यांच्या अंगरक्षकांनी कंट्रोल रूमला सर्व घडामोडींची माहिती दिली होती. अशी माहिती आता सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांचे कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.
बंदोबस्तावरील पोलिसांवर कारवाई? - त्याशिवाय बंडखोर नेत्याच्या सुरक्षेस असलेल्या पोलिसांवर कारवाई होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. चारही मंत्र्याच्या सुरक्षा रक्षकांनी याबाबत वाॅकीटाॅकवर माहिती दिली होती. तर एकनाथ शिंदे सुरतच्या दिशेने जात असल्याची पूर्ण माहिती कंट्रोल रूमला देण्यात आल्याचं समोर आलं आहे. शिंदे आपल्यासोबत 5 ते 6 आमदारांना घेऊन गुजरातला जात असल्याची माहिती गृहमंत्र्यांना होती असं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. या घडामोडीत पोलिसांचा दोष आढळून येत नसल्याने त्यांच्यावर कारवाई होणार नसल्याची माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजली आहे. सध्या 50 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी केला आहे. भाजपशासित आसाम राज्यात शिंदेंच्या गटाला आश्रय देण्यात आला होता. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार बंडाची तयारी करत असताना याची माहिती इंटेलिजन्सला पोहोचली नाही याची शक्यता कमी आहे. सेनेत फोडाफोडी होणार, आमदार सूरतला जाणार आणि महाविकास आघाडी सरकारची कोंडी होणार यासंबंधींची संभाषणं झाली असणार मात्र त्याची कानोकान माहिती कोणत्याही पोलीस यंत्रणेला कशी लागली नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
दरम्यान, रातोरात एकनाथ शिंदेंसह अन्य मंत्री आणि आमदारांनी सरकारी सुरक्षा सोडली. महाराष्ट्राच्या सिमेवरच सर्वांनी सुरक्षा रक्षकांना माघारी पाठवलं. मात्र यावेळी सुरक्षा रक्षक आणि पोलीस अधिकारी काय करत होते असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता संशयाची सुई वळसे पाटील यांच्याकडे गेल्याचं चित्र आहे.
राजकीय मंडळी महाराष्ट्र सोडून कुठेतरी जात होती. एकाच वेळी एवढं मोठं बंड घडत होतं. याची कुणकुण सरकारी यंत्रणांना लागली कशी नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संबंधित अधिकारी आणि सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा -विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळसुद्धा नॉटरिचेबल