मुंबर्ई - राज्यातील तरुणांना बोटींगचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सागरी मंडळाचा चेन्नई भारतीय विद्यापीठासोबत आज करार झाला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ७ हजार लोकांना प्रशिक्षित केले जाईल, अशी माहिती बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
राज्यातील नौकानयन क्षेत्राच्या वाढीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून देशातील पहिल्या चेन्नई सागरी विद्यापीठासोबत महाराष्ट्र मंडळाने सामंजस्य करार केला आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित सैनी आणि भारतीय सागरी विद्यापीठाचे संचालक कमोडोअर राजीव बन्सल यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या. या करारामुळे राज्यातील इनलँड वेसल्सवर तैनात होणाऱ्या सुमारे ७ हजार तरुणांना नौकानयन विषयक कौशल्य व प्रशिक्षण मिळणार आहे.
संशोधन, अभ्यासक्रम व प्रशिक्षणाचा आराखडा बनवणार
राज्यातील नौकानयन क्षेत्रातील मनुष्यबळास योग्य असे तांत्रिक व इतर प्रशिक्षण देणे, त्यांच्यातील कौशल्य वाढविणे यासाठी भारतीय सागरी विद्यापीठ महाराष्ट्र सागरी मंडळाला सहकार्य करणार आहे. तसेच राज्याच्या किनारपट्टी भागातील सागरी उपक्रमांना चालना देण्यासाठी व सुविधा वाढविण्यासाठी आवश्यक असणारे संशोधन, अभ्यासक्रम व प्रशिक्षण यांचा आराखडा तयार करण्यासाठीही विद्यापीठ सहकार्य करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सागरी क्षेत्राच्या विकासासाठी लाभ