मुंबई - मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आपल्या सुरक्षेसाठी बाऊन्सर नेमल्याचे पडसाद पालिका वर्तुळात उमटले. खासगी बाऊन्सर नियुक्त केल्याने सर्वत्र टीका झाल्यावर पालिका आयुक्तांनी सुरक्षेसाठी नेमलेले अर्धे बाऊन्सर घरी पाठवले आहेत. इतकेच नव्हे तर हे बाऊन्सर नियुक्त करणाऱ्या सुरक्षा विभागाच्या उपायुक्ताला चांगलेच झापले असल्याची चर्चा पालिका मुख्यालयात आहे.
मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार होत असताना पालिकेकडून रुग्णांवर उपचार करताना मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. हा खर्च करताना पालिकेतील नगरसेवकांना, गटनेत्यांना, स्थायी समिती तसेच सभागृहाला विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेना सोडून इतर सर्व राजकीय पक्षांकडून केला जात आहे. कोरोना दरम्यान मास्क, पीपीई किट, मृतदेह बॅग खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत भाजपाने आंदोलन केले होते. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याने पालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर भाजपाने आंदोलन करत पोस्टर चिकटवली होती. यानंतर पालिका आयुक्तांच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर नियुक्त करण्यात आले.
हेही वाचा -महापालिका आयुक्तांच्या सुरक्षेसाठी खासगी बाऊन्सर; पालिकेच्या सुरक्षा रक्षकांवर भरोसा नाही का? विरोधकांचा सवाल
एखाद्या आयएएस अधिकाऱ्याने व पालिका आयुक्ताने स्वतःच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर नियुक्त केल्याने तसेच करदात्यांच्या पैशांची ही उधळपट्टी असल्याने आयुक्तांवर मोठ्या प्रमाणात टिका झाली. त्यानंतर संतप्त झालेल्या आयुक्तांनी सुरक्षा विभागाच्या उपायुक्तांना आपल्या दालनात बोलवून झापले असल्याची चर्चा पालिका मुख्यालयात आहे. इतकेच नव्हे तर आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या 18 बाऊन्सर पैकी अर्ध्या बाऊन्सरना घरी पाठवले आहे. पालिकेत सध्या प्रवेश द्वार, अतिरिक्त आयुक्तांची कार्यालये, आणि आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर 9 बाऊन्सर अद्यापही तैनात आहेत.