मुंबई -मुंबईमधील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. लसीचा तुटवडा असल्याने लसीकरणात अडचणी येत आहेत. लसीचा पुरवठा व्हावा यासाठी पालिकेने ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर मुंबईच्या सिस्टर कर्सन असलेल्या सेंट पिटर्सबर्ग, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, बुसान, स्टूटगार्ड आणि योकोहोमा या ६ शहरांच्या महापौरांना पत्र लिहून लसीचा पुरवठा करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.
लसीसाठी ६ शहरांच्या महापौरांना आवाहन
कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाला वेग आणण्याच्यादृष्टीने मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी ग्लोबल टेंडरही मुंबई महापालिकेने काढले असून त्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. यासह मुंबई महापालिकेने लसींसाठी जगातील सेंट पिटर्सबर्ग, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, बुसान, स्टूटगार्ड आणि योकोहोमा या शहरातील महापौरांना पत्र पाठवली आहेत. सध्याच्या कठीण काळात मुंबईला कोविडशी लढण्यासाठी आपल्या मदतीची आवश्यकता आहे. तसेच या शहरांनी यशस्वीपणे कोरोनावर नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे मुंबई शहराला मदतीचा हात द्यावा. तसेच उपलब्ध असतील त्या लसीचे १ कोटी ८० लाख डोस द्यावेत, असे मुंबई महापालिकेने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
चर्चा सुरू
सहा ६ शहरांनी लसीच्या डोसची किंमत कळवून पुढील व्यवहार ठरवावा, असेही पालिकेने या पत्रात नमूद केले आहे. या ६ शहरांपैकी जपानमधील योकोहोमा या शहराने लस नाही, पण मुंबईसाठी आर्थिक मदत पाठवू, असे कळवले आहे. दरम्यान मुंबई महापालिकेने लसींसाठी काढलेल्या ग्लोबल टेंडरला आठ पुरवठादार कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. मात्र त्यातील अस्ट्राझेनेका, फायझर या पुरवठादार कंपन्यांनी माघार घेतली आहे. या कंपन्यांनी लसींचा पुरवठा करावा, यासाठी मुंबई महापालिकेने चर्चा सुरू केली असल्याचे सांगण्यात आले.