मुंबई- देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी झोपडपट्टी भागात पोलीस व्हॅनमध्ये पालिका पथकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. झोपडपट्टी विभागात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला होता. कोरोनापासून वाचण्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे व तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही अनेक मुंबईकर मास्क लावताना दिसत नाहीत. यासाठी महापालिकेने यापूर्वीच 'मिशन झोपडपट्टी' सुरू केले आहे.
पोलीस व पालिकेची संयुक्त कारवाई -
सामाजिक अंतर, तोंडावर मास्क, हात स्वच्छ धुणे, गर्दीत जाणे टाळणे याबाबत लोकांमध्ये सतत जनजागृती केल्याने मुंबईकरांनी सहकार्य करत पालिकेच्या सूचनांचे पालन केले आहे. परंतु झोपडपट्टीतील काही भागात आजही लोक विना मास्क घराबाहेर पडत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापुढे झोपडपट्टीतील काही भागात लोक विना मास्क फिरतात यांच्यावर पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेचे पथक पोलीस व्हॅनमध्ये पोलिसांबरोबर असणार आहेत, अशी माहिती मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी दिली.
हेही वाचा-मुंबईकरांनो काळजी घ्या.. मुंबईत कोरोनाची स्थिती चिंताजनक, वाढतोय कोरोनाबाधितांचा आकडा
आतापर्यंत ३ लाख ९८ हजार लोकांवर कारवाई!
विना मास्क घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी पालिकेच्या २४ वॉर्डापैकी प्रत्येक वॉर्डात ९० जणांची टीम कार्यरत आहेत. महापालिकेने ३ लाख ९८ हजार ८२४ लोकांवर कारवाई केली. या कारवाईमधून ८ कोटी ३३ लाख ७६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे काकाणी यांनी सांगितले.