महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना प्रतिबंधात्मक लसीची चाचणी; स्वयंसेवकांना कोरोना कवच देण्यासाठी प्रयत्नशील - corona vaccine in mumbai

ऑक्सफर्डकडून कोरोनावरील लस तयार करण्यात येत आहे. लवकरच याची मानवी चाचणी होणार आहे. त्यासाठी केईएम आणि नायर रुग्णालयांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र चाचण्यांची प्रक्रिया पार पाडण्यासाठी स्वयंसेवकांनी पुढे येण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केले आहे. संबंधित स्वयंसेवकांना कोरोना कवच देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी म्हटले.

corona warriors in mumbai
कोरोना लस चाचणी; स्वयंसेवकांना कोरोना कवच मिळण्यासाठी प्रयत्नशील, आयुक्तांची माहिती

By

Published : Sep 2, 2020, 9:25 AM IST

मुंबई - ऑक्सफर्डकडून कोरोनावरील लस तयार करण्यात येत आहे. त्यानुसार या लसीची मानवी चाचणी मुंबई महानगर पालिकेच्या नायर आणि केईएम रुग्णालयात होणार आहे. यासाठी काही परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू असून दुसरीकडे रुग्णालयाकडून स्वयंसेवकांचा शोध सुरू असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली आहे.

ऑक्सफर्डकडून कोरोनावरील लस तयार करण्यात येत आहे.

स्वयंसेवकांनी पुढे यावे, त्यांच्यासाठी सुरक्षा कवच देण्यासंबंधी विचारणा पालिकेने आयसीएमआरकडे केली आहे, असे ते म्हणाले. आयसीएमआरकडून तरतूद न झाल्यास पालिका यासाठीची विशेष तरतूद करून स्वयंसेवकांना विमा कवच देण्याचा निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

नायर आणि केईएम रुग्णालयांत ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी

ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीच्या चाचणीसाठी नायर आणि केईएम रुग्णालयाची निवड झाली आहे. त्यानुसार दोन्ही रुग्णालयांमध्ये लवकरच प्रत्यक्षात चाचणीला सुरुवात होणार आहे. 1 सप्टेंबरपासून चाचणी होण्याची शक्यता होती. पण अजूनपर्यंत दोन्ही रुग्णालयाच्या इथिक्स कमिटीकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. त्यातच इथिक्स कमिटीने चाचणीसाठी पुढे येणाऱ्या स्वयंसेवकांना सुरक्षितता म्हणून काही विमा कवच आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. कमिटीच्या या प्रश्नानुसार आम्ही आयसीएमआरकडे अशी काही तरतूद आहे का? यासंबंधी विचारणा केली आहे, असे काकाणी यांनी सांगितले आहे. आयसीएमआरएचे उत्तर आल्यानंतर इथिक्स कमिटीकडून परवानगी मिळेल आणि त्यानंतर चाचणीला सुरुवात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

चाचण्यांसाठी पुढे आल्यास 'कोरोना कवच'ची मागणी

दरम्यान स्वयंसेवकांना सुरक्षा कवच मिळणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोनासारख्या आजारावरील लसीच्या चाचणीसाठी कुणी पुढे येत असेल ते त्यांना सुरक्षा द्यायलाच हवे. एकीकडे आपण पालिका कर्मचारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांना विमा देत आहोत. तर दुसरीकडे कोरोनाला हरवण्यासाठीच्या महत्वाच्या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुढे येणाऱ्यांना विमा का नाही, असा प्रश्न निर्माण होतोय.

त्यातही उद्या दुर्दैवाने मानवी चाचणीदरम्यान कोणाला काही झाल्यास, त्याचा ठपका पालिका आणि आमच्या रुग्णालयावर लागेल. त्यामुळे हे टाळण्यासाठी योग्य प्रकारे मानवी चाचणी पार पाडण्यासाठी स्वयंसेवकांना विमा कवच मिळावे, अशी भूमिका पालिकेची आहे. याच अनुषंगाने जर आयसीएमआरने अशी काही तरतूद केली असेल तर ठीक. अन्यथा पालिका आपल्या स्वयंसेवकांना विमा कवच देईल. ते किती असेल याचा निर्णय नंतर घेऊ. पण असे कवच दिले नाही, आणि काही झालेच तर पुढे भविष्यात कुणी स्वयंसेवक म्हणून पुढे येणार नाही, ही बाब लक्षात घेऊन ही आम्ही यादृष्टीने निर्णय घेणार असल्याचेही काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details