मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. हे काम २ व ३ डिसेंबरला होणार असल्याने या काळात दादर, प्रभादेवी, माहीम आदी भागात पाणीपुरवठा होणार नाही. तर सातरस्ता, धोबीघाट परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे.
पाणी जपून वापरा...! दादर, प्रभादेवी, माहीममध्ये २ आणि ३ डिसेंबरला पाणीपुरवठा बंद - जलवाहिनी गळती न्यूज
पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन दुरुस्तीचे काम करण्यासाठी महापालिकेने शहरातील दादर, प्रभादेवी, माहीम या भागातील पाणीपुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. सेनापती बापट मार्ग येथे अस्तित्वात असलेल्या ब्रिटिशकालीन जलवाहिनीची गळती दुरुस्त करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
![पाणी जपून वापरा...! दादर, प्रभादेवी, माहीममध्ये २ आणि ३ डिसेंबरला पाणीपुरवठा बंद water supply news](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9687715-1074-9687715-1606488889840.jpg)
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील गावडे चौक, सेनापती बापट मार्ग येथे अस्तित्वात असलेल्या ब्रिटिशकालीन १४५० मिली मीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) मुख्य जल वाहिनीवरील गळती दुरुस्त करण्याचे काम दिनांक २ व ३ डिसेंबर २०२० ला हाती घेण्यात येणार आहे. सदर कामासाठी २ डिसेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होऊन ते दिनांक ३ डिसेंबर २०२०ला दुपारी २ वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येईल. यामुळे या कालावधीत ‘ज- दक्षिण’ आणि ‘जी-उत्तर’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तर काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
या परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद -
जी-दक्षिण विभागात २ डिसेंबरला दुपारी २ ते ३ यावेळेत डिलाईल रोड आणि दुपारी ३.३० ते सायं. ७ या वेळात ना. म. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ, प्रभादेवी, जनता वसाहत, आदर्श नगर, एलफिस्टन (लोअर परळ), या परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नसल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे.
जी-उत्तर विभागात २ डिसेंबरला सायं. ४ ते ७; तसेच सायं. ७ ते रात्री १० या वेळेत एलफिस्टन (लोअर परळ), काकासाहेब गाडगीळ मार्ग, सेनापती बापट मार्ग, गोखले मार्ग, वीर सावरकर मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टि. एच. कटारीया मार्ग, कापड बाजार, माहीम (पश्चिम) पूर्ण परिसर, माटुंगा (पश्चिम) आणि दादर (पश्चिम) परिसर या परिसरांमध्ये पूर्णतः पाणीपुरवठा होणार नाही.
जी दक्षिण विभागात ३ डिसेंबरच्या पहाटे ४.३० ते सकाळी ७.४५ या वेळात डिलाईल रोड, ना. म. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग या परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
पाणीपुरवठा कमी -
जी दक्षिण विभाग - गुरुवार दिनांक ३ डिसेंबरला पहाटे ४ ते सकाळी ७ या वेळात क्लार्क रोड, धोबी घाट, सातरस्ता; या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. संबंधित परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आदल्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करुन ठेवावा, तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करुन सदर जलवाहिनी गळती दुरुस्ती कालावधीमध्ये महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.