महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई पालिकाही एक्सिस बँकेतील खाती बंद करणार - महापौर किशोरी पेडणेकर - अॅक्सिस बॅंके

ठाणे महानगरपालिकेने अॅक्सिस बॅंकेतील सर्व बँक खाती राष्ट्रीयकृत बँकेकडे वळती करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता मुंबई महानगरपालिका देखील खाती वळती करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे अॅक्सिस बँकेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

FILE PHOTO
प्रतिकात्मक फोटो

By

Published : Dec 28, 2019, 6:33 AM IST

मुंबई - माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेमधील वादाचा फटका आता एक्सिस बँकेला बसू लागला आहे. ठाणे महानगरपालिकेने अॅक्सिस बँकेतील सर्व खाती राष्ट्रीयकृत बँकेमध्ये वळवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मुंबई महापालिकेची खातीही अॅक्सिस बँकेतून बंद करणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. वरळी येथील एसआरए योजनेतील घरांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम शिवसेना युवा नेते व आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज संपन्न झाला. यानंतर पत्रकारांशी बोलताना महापौर पेडणेकर यांनी ही माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेने अॅक्सिस बँकेत असलेल्या कर्मचाऱ्यांचे खाते शासकीय बँकेत वर्ग केले आहे. ठाणेपाठोपाठ आता मुंबई महापालिकेनेही या बँकेतील कर्मचाऱ्यांची खाती इतर बँकेत वर्ग करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबतचा निर्णय घेण्यासाठी गटनेते आणि सर्व नेत्यांची चर्चा केली जाणार आहे. मुख्यमंत्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महापौर पेडणेकर यांनी दिली. पालिकेच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना अॅक्सिस बँक ४० लाखांचा विमा देते. त्यामुळे ४० लाखांचे सुरक्षा कवच देते का?, याची चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही पेडणेकर यांनी सांगितले. पंजाब नॅशनल बँकेसारखी बँक बुडीत निघाली. आपल्या मेहनतीचा पैसा बुडू नये याची प्रत्येकाला काळजी असते. मुंबईकरांचा आणि करदात्यांचा पैसा असा कुठल्याही बँकेत जाऊन बुडू नये याची आम्हीही काळजी घेऊ. त्यासाठी दोन टक्क्यांनी कमी जरी पैसे मिळाले तरी चालेल. त्यामुळे अॅक्सिस बँकेतील खाती काढून राष्ट्रीयकृत बँकेत पैसे सुरक्षित राहतील, या दृष्टीने विचार सुरु असल्याचे महापौर पेडणेकर यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details