मुंबई- देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पालिकेने धोकादायक ब्रिटिशकालीन पुलांपैकी १२ पूल केबल ब्रीज पद्धतीने बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिका १७७५ कोटी रुपयांचा खर्च करणार असून २०२४-२५ पर्यंत या पुलांचे काम पूर्ण होणार आहे. या पुलांचे बांधकाम महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व पालिकेकडून केले जाणार असल्याची स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.
१७७५ कोटी खर्चून बांधणार १२ केबल ब्रीज केबल ब्रीज बांधण्याला प्राधान्य -
अंधेरीत ३ जुलै २०१८ ला गोखले ब्रीज कोसळून दोन जणांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय ब्रीज (१४ मार्च २०१९) रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेला होता. त्यानंतर पालिकेने मुंबईतील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. त्यानुसार जीर्ण पूल पाडून नव्याने बांधणे आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये कमी वेळेत बांधकाम होणारे आणि पर्यावरणपुरक केबल ब्रीज बांधण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. पुढील एका वर्षांत या पुलांची कामे सुरू करून आगामी तीन-चार वर्षांत कामे पूर्ण करण्यात येतील, असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला.
असा होणार फायदा -
केबल स्टेड पद्धतीमुळे पुलांचे मजबूत बांधकाम होणार. पायासाठी कमी जागा लागल्याने मोकळी जागा वाढणार आहे. मोठ्या पुलांमुळे वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे. बांधकामाच्या वेळीही वाहतूक सुरळीत राखता येणार आहे. तसेच पुलाच्या आकर्षक स्वरूपामुळे आणि लेझर लाईटमुळे सौंदर्यीकरणात भर पडणार असल्याचेही जाधव म्हणाले आहेत.
ब्रीजसाठी असा होणार खर्च -
रे रोड ब्रीज - १७५ कोटी
टिळक ब्रीज दादर - ३७५ कोटी
भायखळा ब्रीज - २०० कोटी
घाटकोपर ब्रीज - २०० कोटी
बेलासीस मुंबई सेंट्रल - १५० कोटी
आर्थर रोड ब्रीज - २५० कोटी
सेंट मेरी माझगाव - ७५ कोटी
करी रोड ब्रीज - ५० कोटी
मांटुगा ब्रीज - ५० कोटी
एस ब्रीज भायखळा - ५० कोटी
लोअर परळ ब्रीज - १०० कोटी
महालक्ष्मी ब्रीज - १०० कोटी