मुंबई -मुंबईमध्ये काही वर्षांपूर्वी पाऊस कमी पडल्याने पाणी कपातीच्या संकटाला सामोरे जावे लागले होते. त्यासाठी पालिकेने 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' योजना राबवण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही योजना राबविण्यात पालिका प्रशासनाला अपयश आले आहे. त्यानंतर आता पालिकेने 'कॅच द रेन' अभियान राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
रेन वॉटर हार्वेस्टिंग -मुंबईकरांना दररोज 3800 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा ( 3800 million liters of water for Mumbai ) रोज मुंबई महापालिकेकडून केला जातो. परंतु प्रत्यक्षात प्रतिदिन 4505 दशलक्ष लिटर एवढ्या पाण्याची गरज आहे. मागणी आणि पुरवठा यात 700 दशलक्ष लिटर पाण्याची ( 700 million liters of water demand ) तफावत आहे. नवीन धरण बांधून त्यातून नागरिकांना पाणी पुरवठा करण्याची बाब खर्चिक आणि दिर्घकालीन ( new dam to supply water ) आहे. पाणी जमिनीत मुरवून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग राबविणे बंधनकारक केले आहे.
मालमत्ता करात 5 टक्के सूट -2002 मध्ये सुरुवातीला 1 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे पालिकेने बंधनकारक केले होते. त्यानंतर 2007 मध्ये त्यात बदल करून 300 चौरस मीटरवर बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक केले आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगची अंमलबजावणी करण्यासाठी नागरिक आणि विकासक यांना मालमत्ता करात 5 टक्के सूट देण्यात आली आहे. मुंबईमधील सुमारे 50 हजार सोसायट्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना अद्याप राबविण्यात आलेली नाही.
20 वर्षात अंमलबजावणी नाही -मुंबईमध्ये नवीन बांधकाम होणाऱ्या इमारतींना 2002 मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक केले होते. गेल्या 20 वर्षात रेन वॉटर हार्वेस्टिंगची योग्य प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही. ही योजना राबवण्यासाठी माजी महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना आपल्या विभागात तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र परदेशी यांच्यानंतर दोन पालिका आयुक्त बदलले तरीही हा अहवाल अद्याप समोर आलेला नाही. 2012 मध्ये तत्कालीन माहापौर सुनिल प्रभू यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत श्वेतपत्रिका काढण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. गेल्या 10 वर्षात ही श्वेतपत्रिकाही समोर आलेली नाही. मुंबईमधील 1200 उद्यानांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. उद्यानांमध्येही ही संकल्पना पालिकेला राबवता आलेली नाही.