मुंबई - मालाड पिंपरीपाडा येथे सुरक्षा भिंत कोसळून २१ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची चौकशी करून दोषी असलेले कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले. मुंबईतील पावसाबाबत पालिकेच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. विशेष म्हणजे 'ई टिव्ही भारत'च्या बातमीच्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना जोशी यांनी ही माहिती दिली. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना पालिका ५ लाखांची मदत देईल, असेही जोशी यांनी सांगितले.
पश्चिम उपनगरातील मालाड पिंपरी पाडा येथे पालिकेचे जलाशय आहे. या जलाशयाच्या बाजूला संरक्षक भिंत बांधण्यात आली होती. ही संरक्षक भिंत सोमवारी रात्री पावसात कोसळली. त्याखाली २१ जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी दगडी भिंत होती. त्याखाली ४० वर्ष लोक राहत होते. गेल्या तीन वर्षांपूर्वी या ठिकाणी नव्याने भिंत बांधण्यात आली. ती कमी जाडीची आणि सुमारे ३० फूट उंच भिंत होती. या भिंतीला पाणी जायला छिद्रे ठेवण्यात आली नव्हती. यामुळे कालच्या मुसळधार पावसात या भिंतीच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ही भिंत कोसळली. याप्रकरणी भिंत बांधणारा कंत्राटदार आणि संबंधित पालिका अधिकारी दोषी असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.