मुंबई- कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी केईएम रुग्णालयात कोविड कक्षांची उभारणी करण्यात आली. निविदा न मागवता खर्च करण्याचा दिलेल्या अधिकाराचा वापर करत खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून रुग्णालयात चार कक्षांची उभारणी करण्यात आली. त्यासाठी तब्बल ३ कोटी ८८ लाख ४ हजार ५०६ रुपये खर्च करण्यात आले आहेत.
केईएममध्ये कोरोनावर उपचार -
कोरोना रुग्णांसाठी कस्तुरबा रुग्णालयासहित सुरुवातीला नायर, राजावाडी रुग्णालयांसह इतर महापालिका रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. परंतु रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता केईएम रुग्णालयात कोरोना उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी वाढू लागली. त्यामुळे केईएम रुग्णालयात डायलेसिसची आवश्यकता असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कक्षाची स्थापना करण्यात आली.
निविदा न मागवता खर्च -
केईएम रुग्णालयात यासाठी अतिरिक्त आयुक्त व उपायुक्तांना दिलेल्या अधिकाराच्या अधीन राहून महापालिकेने निविदा न मागवता काही कंत्राटदारांच्या नेमणूक करत त्यांच्याकडून कामे करून घेतली. केईएम रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २, ६ आणि १० मध्ये तसेच इएमएस ऑपथल वॉर्ड क्रमांक १३ मेन पॅसेजमध्ये कोविड १९ विलगीकरण कक्ष बनण्यात आला. तसेच यासाठी अतिरिक्त ऑक्सिजन टँक बनवण्यासाठी लक्ष्मी एंटरप्रायझेस या कंपनीला काम देण्यात आले. तर विद्युत कामांसाठी डिजिटल टेलिसिस्टीम कंपनीवर जबाबदारी सोपवण्यात आली होती. तसेच इतर कामांसाठी अन्य कंपनींची निवड करण्यात आली. या विविध कामांसाठी ३ कोटी ८८ लाख ४ हजार ५०६ रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
डायलेसिसची सुविधा -
केईएम रुग्णालयांत सर्वसाधारण रुग्णांवरील उपचार करण्यात येत असल्याने याठिकाणी कोविड कक्ष सुरू न करण्याचा निर्धार प्रशासनाने केला होता. परंतु या कालावधीत सर्वसाधारण रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने याठिकाणी कोविड रुग्णांसाठी डायलेसीसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.