मुंबई -मुंबईत रविवारी पहाटे दरड आणि घरे कोसळून ३० जणांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर भाजपाने महापालिकेच्या स्थायी समितीत सभा तहकुबी मांडली. ही सभा तहकुबी विचारात न घेता स्थायी समिती अध्यक्षांनी श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करण्यात आली. सत्ताधारी शिवसेनेने चर्चेतून पळ काढल्याचा आरोप केला आहे. त्यावर भाजपाने मृतांच्या टाळूवरचे लोणी खाऊ नये, मृतांच्या विषयात तरी राजकारण करू नये, असा टोला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी लगावला आहे.
मृतांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब
मुंबईमध्ये शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री मुसळधार पाऊस पडल्याने चेंबूर वाशीनाका, विक्रोळी सूर्या नगर तसेच मुलुंड येथे दरड आणि घरे कोसळून ३० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकारने मृतांना प्रत्येकी ५ लाखाची मदत जाहीर केली आहे. जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भाजपाचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सभा तहकुबीचा प्रस्ताव मांडला. तसे पत्रही स्थायी समिती अध्यक्ष व पालिका चिटणीसांना दिले होते. बैठक सुरू होताच शिंदे यांनी सभा तहकुबी मांडली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी भाजपाच्या तहकुबीकडे लक्ष न देता दुर्घटनांमध्ये झालेल्या मृतांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब केली.
'सत्ताधाऱ्यांनी चर्चेतून पळ काढला'
भाजपाचा आरोप यावर शिवसेनेने श्रेयवादाची लढाई करत सदर सभा तहकुबी विचारात न घेता कामकाजाच्या प्रथा परंपरेचे उल्लंघन करून श्रद्धांजलीचा प्रस्ताव सभागृह नेत्यानी मांडण्याची परंपरा धुडकावून स्वतः थेट अध्यक्षांनी फक्त श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावावरही कोणतीही चर्चा न करता श्रद्धांजली वाहून सभा तहकूब केली. खरे पाहता दरड कोसळीचे प्रकार वारंवार घडून जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी नगरसेवकांचे मत, विचार व सूचना आणि प्रशासनाची भूमिका यावर साधकबाधक चर्चा होणे अपेक्षित होते. पण मुर्दाड प्रशासन आणि असंवेदनशील सत्ताधारी शिवसेनेने चर्चेपासून पळ काढला, असा आरोप भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे व प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे.
'नको त्या गोष्टीचे राजकारण करू नये'
विरोधक असलेल्या भाजपाकडे काही काम राहिलेले नाही. त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नाही. मुंबईमधील दुर्घटनांमध्ये मृत्यू झाले आहेत, त्यांना श्रद्धांजली वाहणे आणि त्यांना कशी मदत करता येईल त्यादृष्टीने आज खऱ्या अर्थाने विचार करण्याची आवश्यकता आहे. भाजपा नुसता भाषणबाजी करून राजकारण करण्याचा प्रयत्न करत असेल तर हा मृतांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. भाजपाने लोकांचे हित कशात आहे हे बघावे. भाजपाची संवेदना मृत झाली आहे. त्यामुळे त्यांचे असे भाष्य सुरू झाले आहे. आज दुखवटा व्यक्त करून सभा तहकूब केली आहे. मृतांवरही बोलून राजकारण करायचे भाजपाने सोडून दिले पाहिजे. मुंबईकर अडचणीत असतील त्यावरच्या उपाययोजना त्यांनी सुचवाव्यात, त्यावर सत्ताधारी म्हणून आम्ही नक्की विचार करू. मात्र त्यांनी नको त्या गोष्टीचे राजकारण करू नये, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटले आहे.