मुंबई - मुंबईच्या शहरातून पश्चिम उपनगरात जाण्यासाठी दोन ते अडीच तासाचा कालावधी लागत आहे. यामुळे इंधनही वाया जात आहे. यावर उपाय म्हणून पालिकेने कोस्टल रोड प्रकल्प ( Costal Raod Mumbai ) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कोस्टल रोडच्या कामाला गती आली आहे. आतापर्यंत ५८ टक्के काम पूर्ण झाले आहे. "मावळा" या टीबीएम मशीनने दुसऱ्या बोगद्याचा ६०० मीटरचा टप्पा पूर्ण केला आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे नोव्हेंबर २०२३ अखेरपर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत येईल असा विश्वास मुंबई महानगरपालिका प्रशासनाला आहे.
महापालिकेचा महत्वाकांशी प्रकल्प -कोस्टल रोड हा मुंबई महापालिकेचा महत्वाकांशी असलेला हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील प्रवास सुखकर होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे प्रकल्पाचा वेग मंदावला होता. मात्र आता या प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. आतापर्यंत ५८ टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील एकूण १११ हेक्टरपैकी १०७ हेक्टर म्हणजे ९७ टक्के भरणी पूर्ण झाली आहे. तर, तटीय भिंतीचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलांखाली बांधण्यात येणाऱ्या १७५ एकल स्तंभ खांबापैकी ७० म्हणजे ४० टक्के खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. या प्रकल्पात प्रत्येकी २.०७० किलोमीटर अंतराचा बोगदा दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहे. यापैकी, प्रियदर्शिनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गाकडे (मरिन ड्राईव्ह) जाणारा बोगदा यापूर्वीच पूर्ण झाला आहे, तर दुसऱ्या बाजूच्या बोगद्याचे देखील ३९ टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.