मुंबई- बृहन्मुंबई महानगरपालिकेने ९ एप्रिल ते दिनांक ८ सप्टेंबर, २०२१ या पाच महिन्याच्या कालावधीत पालिका हद्दीतील रस्त्यांवरील ३१ हजार ३९८ खड्डे बुजवले आहेत. त्याचे क्षेत्रफळ सुमारे १ लाख ५६ हजार ९१० चौरस मीटर इतके होते, असा दावा महापालिकेने केला आहे. विशेषतः डांबरी रस्त्यांवर पावसाळी पाण्यामुळे रस्त्यांवर खड्डे तयार होण्याची समस्या निर्माण होते. ही बाब लक्षात घेता यापुढे मोठ्या रस्त्यांसह ६ मीटर रुंदीच्या लहान रस्त्यांचेही सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण महानगरपालिका प्रशासनाने अवलंबले असून त्याची कार्यवाही सुरु झाली असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
खड्डे बुजवायला कोल्ड मिक्स
बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या निकाली काढण्यासाठी प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत असतात. रस्त्यांवर निदर्शनास आलेले खड्डे त्वरीत बुजविण्याचे कार्य महानगरपालिकेतर्फे हाती घेण्यात येते. त्यासाठी महानगरपालिकेच्या वरळी येथील अस्फाल्ट प्लांट येथे निर्मित कोल्ड मिक्स महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांना त्यांनी नोंदवलेल्या मागणीप्रमाणे नियमितपणे पुरवण्यात येतो.
दोन वर्षांचे कंत्राट
रस्त्यांवर खड्डे होवू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच खड्डे बुजविण्यासाठी परिमंडळांनुसार निविदा काढून महानगरपालिकेने कंत्राटदार नियुक्त केले आहेत. हे कंत्राट दोन वर्षाचे आहे. प्रत्येक विभाग कार्यालयाला दरवर्षी २ कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने दीड कोटी रुपये हे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तर उर्वरित ५० लाख रुपये हे खड्डे बुजविण्यासाठी दिले आहेत. याशिवाय, प्रकल्प रस्ते व हमी कालावधीत असलेल्या रस्त्यावर पडलेले खड्डे कंत्राटदाराकडून विनामूल्य भरण्यात येतात. हे खड्डे भरण्यासाठी महानगरपालिकेतर्फे कोणताही मोबदला दिला जात नाही.