मुंबई -मुंबईत गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या प्रसारादरम्यान मलेरियाकडे दुर्लक्ष झाल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ (Malaria Patients Hike in Mumbai) झाली. मलेरियाला रोखण्यासाठी पालिकेने ऍक्शन प्लान (BMC action plan to prevent Malaria) तयार केला आहे. याची अंमलबजावणी न करणाऱ्या संस्था, सोसायट्या, डॉक्टर, हॉस्पिटल आणि लॅब यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
पालिकेचा ऍक्शन प्लान - मुंबईमधून 2030 पर्यंत मलेरिया या आजाराला पूर्णपणे संपवण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिकेने मलेरियाच्या आळ्या मिळणाऱ्या जागा आणि मलेरियाच्या रुग्णांची माहिती न देणारे डॉक्टर आणि लॅब यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक डॉक्टर आणि हॉस्पिटल यांना मलेरिया रुग्णांचे रिपोर्ट आणि रक्ताचे नमुने साठवून ठेवावे लागणार आहेत. मलेरियाच्या आळ्या मिळून येणाऱ्या कॉर्पोरेट संस्था आणि रहिवाशी वस्त्यांना ऍक्शन प्लान देऊन 24 तासांची मुदत देऊन त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.
हेही वाचा -मुंबईत १० दिवसांत मलेरिया, गॅस्ट्रोच्या रुग्ण संख्येत दुप्पट वाढ
मलेरिया अधिकाऱ्याकडे नोंदणी - मुंबईत मलेरिया रुग्ण आढळून आले तरी बहुतेक रुग्णांची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला दिली जात नव्हती. यावर उपाय म्हणून पालिकेच्या आरोग्य विभागात मलेरिया अधिकारी हे पद निर्माण केले जाणार आहे. लॅब, खासगी डॉक्टर आणि रुग्णालयांना मलेरिया रुग्णाची माहिती द्यावी लागणार आहे. असे न केल्यास संबधित रुग्णालये, डॉक्टर आणि हॉस्पिटल यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
रुग्णसंख्या पुन्हा वाढली - गेल्या तीन वर्षांत सरासरी पाच हजार रुग्ण आढळून येत आहेत. २०१७ मध्ये ६०१७ रुग्णांची नोंद झाली होती. तर ६ जणांचा मृत्यू झाला. २०१९ मध्ये ४३५७ तर २०२० मध्ये ५००७ रुग्णांची नोंद झाली होती. २०२१ मध्ये ५१७२ रुग्णांची नोंद होऊन एकाचा मृत्यू झाला. मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार असल्याने त्याकाळात मलेरियाकडे लक्ष देणे शक्य झालेले नाही.
तर कारवाई होणार -लवकरच आम्ही खासगी डॉक्टर आणि लॅब चालक यांना नियम व नियमावली सांगणार आहोत. आरोग्य विभागाकडून मलेरिया अधिकारी हे पद आणि एक वेगळा इमेल आयडी बनवला जाणार असून तो खासगी डॉक्टर आणि लॅब चालक यांना दिला जाणार आहे. जे डॉक्टर आणि लॅब चालक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या 188 कलमानुसार कारवाई केली जाणार आहे. या नियमानुसार सहा महिने जेल आणि एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्र होऊ शकतात. जागतिक मलेरिया दिनानिमित्त घराघरात आणि बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन ज्यांना ताप आहे अशा नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी दिली.
हेही वाचा -दिलासादायक! लवकरच मलेरियावरील लस भारतात उपलब्ध होणार