मुंबई- कोरोना रुग्णांचा आकडा सतत वाढत आहे. मुंबईत कोरोनाबाबत चाचण्या मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने त्यात पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. त्यातील बहुसंख्य रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत. यामुळे अशा लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांच्या चाचण्या करू नये, असे परिपत्रक मुंबई महापालिकेकडून काढण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार जोपर्यंत कोरोनाची लक्षणे जाणवत नाहीत तोपर्यंत त्याची चाचणी करू नये, असे आदेश सर्व वॉर्ड अधिकाऱ्यांना आणि आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या चाचण्या करू नये असा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या लोकांना कोरोनाची लक्षणे म्हणजेच ताप आणि खोकला असेल, कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेले ६० वर्षांवरील हाय रिक्स असलेले व्यक्ती यांचीच चाचणी केली जाणार आहे. त्याचसोबत ३४ आठवड्याच्या गरोदर महिला, डायलिसिस आणि केमोथेरेपीचे रुग्ण तसेच आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी ज्यांचा कोरोना रुग्णांसोबत संपर्क आला असल्यास आणि त्यांच्यात लक्षणे दिसत नसल्यास त्यांचीही चाचणी करण्यात येणार आहे.