महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लसीचा पत्ता नाही, लसीकरण केंद्र उघडण्याचा मात्र सपाटा - Corona vaccination centre

मुंबईकरांना लसीचा डोस कधी मिळणार याची शाश्वती नसताना पालिकेने मात्र लसीकरण केंद्र उघडण्याचा सपाटा लावला आहे.

लसीकरण केंद्र उघडण्याचा मात्र सपाटा
लसीकरण केंद्र उघडण्याचा मात्र सपाटा

By

Published : May 8, 2021, 6:54 AM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. त्यातच कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी गर्दी करत आहेत, त्यामुळे लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

मुंबईकरांना लसीचा डोस कधी मिळणार याची शाश्वती नसताना पालिकेने मात्र लसीकरण केंद्र उघडण्याचा सपाटा लावला आहे. मात्र लस नसताना लसीकरण केंद्र उघडून फायदा काय असा प्रश्न मुंबईकरांकडून विचारला जात आहे.

लसीचा तुटवडा -

मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना सुरुवातीला लस देण्यात आली. 1 मार्चपासून 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक, 45 वर्षावरील गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस देण्यात सुरुवात झाली. तर 1 मे पासून 18 ते 44 वयातील नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली. मार्च एप्रिल महिन्यात पालिकेने कोविन ऍपवर नोंदणी केल्यावर लसीकरणाचा स्लॉट मिळण्याआधीच लसीकरण केले. मात्र आपल्याला लसीचा पुरवठा किती होईल याचा विचार न करता खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिली. याचा परिणाम म्हणून लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. लस उत्पादन कंपन्यांकडून लसीचा पुरवठा कमी होत असल्याने कित्येकवेळा लसीकरण बंद ठेवण्यात येत आहे.

नवीन लसीकरण केंद्र -

पालिका आयुक्तांनी कोविन ऍपवर नोंदणी केल्याशिवाय कोणालाही लस दिली जाणार नाही, असे आदेश दिले आहे. दुसरा डोस घेण्यासाठीही नोंदणी बंधनकारक केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. 45 व 60 वर्षावरील अनेक नागरिकांना मोबाईल आणि इंटरनेटचा वापर करता येत नसल्याने कोविन ऍप नोंदणी करणे शक्य नाही. या नागरिकांना पहिला डोस देण्यात आला, मात्र आता दुसरा डोस मिळत नसल्याने अनेक वृद्ध नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहेत. पवई मधील पालिका शाळा, चूनाभट्टी येथील मा साहेब मिनाताई प्रसूति गृह, अपोलो मिल मधील बीएमसी पार्किंग आणि वरळी येथील एनएससीआई येथील लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

लस नसताना लसीकरण केंद -

मुंबईत सध्या महापालिका, सरकार वैद्यकीय सेवा, कोविड सेंटर आणि खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्र उघडण्यात आले. आपल्याकडे लसीचा साठा किती प्रमाणात येणार आहे याची माहिती नसताना केंद्र उघडण्यात आली. आता बहुतके केंद्र बंद असल्याने पालिकेच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढू लागली आहे. एकीकडे लस पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याची तक्रार केली जात असताना, पालिकेने नवीन लसीकरण केंद्रे सुरू करण्याचा सपाटा लावला आहे. या केंद्रात लस कोठून आणणार असा प्रश्न मुंबईकर नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details