मुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या ( BMC ) के पूर्व कार्यालयात असलेल्या भाडे संकलक व त्यांच्या सहकाऱ्याने एका व्यक्तीची दुकाने पालिकेकडे एनेक्चर -२ नोंद करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागितली. ही लाच घेताना पालिकेच्या भाडे संकलक व त्याच्या सहकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( Anti Corruption Bureau ) रंगेहात अटक केली आहे. पालिकेच्या कारभारात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यातच आता पालिका अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडल्याने पालिका प्रशासनाची प्रतिमा आणखी मलिन झाली आहे.
पालिकेच्या एनेक्चर - २ मधून नाव गायब -एका व्यक्तीच्या राहत्या घरास लागुनच पुढील बाजुस त्याचे दुकान आहे. त्याचे घर त्यांच्या पत्नीच्या नावे असून दुकान हे त्याच्या नावे आहे. हे दुकान हे सन १९८५ मध्ये एसआरएमधून रितसर फी भरून तक्रारदाराने स्वतःच्या नावे व्यावसायिक ( Commercial ) करून घेतले होते. त्यानंतर तक्रारदार यांनी सन २०२० मध्ये मुंबई महानगनपालिकामधून एनेक्चर-२ काढले, त्यामध्ये तक्रारदार यांना त्यांच्या दुकानाची नोंद दिसून आली नाही. तसेच तक्रारदाराच्या पत्नीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या सागबाग स्नेहनगर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेचे परि -२ मध्ये नाव समाविष्ट करणेसाठी प्रकल्प अधिकारी (वसाहत) के पूर्व, बीएमसी यांचे कार्यालयात अर्ज केला होता. सदर अर्जाच्या सुनावणीअंती तक्रारदारांच्या पत्नीचे अपील हे अमान्य करण्यात आले होते. तसेच तक्रारदार यांनी दुकाना संदर्भात एसआरए योजनेत व्यवसायीक दुकानाची नोंद पूर्ववत करण्यासाठी दुकानाची कागदपत्रे जोडून दिनांक ६ जानेवारी, २०२२ रोजी अंधेरी के पूर्व विभाग, बीएमसी येथे अर्ज केला होता.