मुंबई- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घराची पाहणी केल्यानंतर ( Union Minister Narayan Rane home ) आता मुंबई महापालिकेच्या निशाण्यावर भाजपचे नेते मोहित कंबोज आले आहेत. पालिकेचे अधिकारी मोहित कंबोज यांच्या घराची तपासणी करणार आहेत. मुंबई महापालिकेने कंबोज यांना नोटीस बजाविली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मोहित कंबोज आणि महाविकास आघाडीतील नेते हे आमने-सामने पाहायला मिळत आहेत. मोहित कंबोज यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक असो की, संजय राऊत यांच्यावर ( Sanjay Raut vs Mohit Kamboj ) गंभीर आरोप केले होते. संजय राऊत यांनीही मोहित कंबोजच्या आर्थिक व्यवहारा संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये मोठा खुलासा केला होता. अशातच कंबोज यांना मुंबई महापालिकेने नोटीस ( Mumbai Municipal Corporation notice to Kamboj ) बजाविली आहे.
हेही वाचा-Tribal Minister Inform : आश्रम शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरणार
काय म्हटले आहे नोटीसमध्ये?
मुंबई महापालिकेच्या एच वेस्ट कार्यालयाने सांताक्रूझ पश्चिम येथील खुशी प्राईड बेलमोंडो बिल्डिंगला नोटीस बजावली आहे. या इमारतीमध्ये भाजपा नेते मोहित कंबोज राहतात. पालिकेच्या कलम 488 नुसार ही नोटीस देण्यात आली आहे. 23 मार्चला किंवा त्यानंतर इमारतीमध्ये काही बेकायदेशीर बांधकाम झाले आहे का याचे मोजमाप घेऊन तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी इमारतीमधील अध्यक्ष, सेक्रेटरी, घर मालक आदींनी त्यांना बांधकामाला दिलेल्या परवानगी आणि नकाशे यांची प्रत सोबत ठेवावी असे नोटीसमध्ये म्हटले आहे.
एकमेकांविरोधात कारवाया वाढल्या -
केंद्रात सत्ता असल्याने भाजपकडून इतर पक्षातील नेत्यांचा आवाज बंद करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात आहे. राज्यातील मंत्री असलेले अनिल देशमुख व नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने ते तुरुंगात आहेत. शिवसेना तसेच इतर पक्षातील नेत्यांवर ईडी, इन्कम टॅक्सच्या धाडी पडत आहेत. याला प्रत्युत्तर म्हणून भाजपा नेत्यांवरही कारवाई करण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू तारा रोड येथील अधीश बंगल्याला नोटीस बजावली आहे. राणे यांच्या बंगल्यात बेकायदेशीर बांधकाम झाल्याचे समोर आले आहे. ते बांधकाम त्यांनी स्वत: तोडावे अन्यथा पालिका ते बांधकाम तोडेल अशी नोटीस पालिकेने दिली होती. त्याला राणे यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे. त्यानंतर आता मोहित कंबोज यांना नोटीस देण्यात आली आहे.