महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rana Couple Residence : राणा दाम्पत्य वास्तव्यास असणाऱ्या इमारतीची पालिकेकडून तपासणी; अहवालानंतर नोटीस बजावणार

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा राहत असलेल्या इमारतीत राहणाऱ्या सर्वच रहिवाशांना नोटीस बजावण्यात आली आहेत. आज ( 30 मे ) सुमारे अडीच तास तपासणी करण्यात ( BMC Investigate Rana couple Residence ) आली.

Rana Couple
Rana Couple

By

Published : May 30, 2022, 4:30 PM IST

मुंबई - खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा राहत असलेल्या इमारतीत राहणाऱ्या सर्वच रहिवाशांना नोटीस बजावण्यात आली आहेत. तसेच, आज ( 30 मे ) सुमारे अडीच तास तपासणी करण्यात ( BMC Investigate Rana couple Residence ) आली. याबाबत पालिकेकडून एक अहवाल तयार केला जाणार आहे. त्यानुसार बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी नोटीस दिली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

इमारतीला नोटीस, तपासणी सुरू - राणा दाम्पत्याला ( BMC Notice Rana Couple Residence ) नोटीस दिल्यानंतर न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यानंतर पालिकेने याच इमारतीमध्ये राहणाऱ्या 8 रहिवाशांना नोटीस बजावली आहे. येत्या 30 मे ला घरात येत पाहणी करून छायाचित्र घेवू. त्यावेळी आपली कागदपत्रे आणि पुरावे उपलब्ध करून द्यावेत, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. यामुळे पालिकेने राणा दाम्पत्य राहत असलेल्या इमारतीकडे आपला मोर्चा वळवला आहे. आज सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास पालिकेचे पथक इमारतीमध्ये दाखल झाले असून, प्रत्येक घराची तपासणी करत आहे. यावेळी फोटो व्हिडिओ घेतले जात आहेत. याचा एक अहवाल बनवून नंतर बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी संबंधितांना नोटीस बजावली जाणार आहे.

पालिकेची नोटीस - खार पश्चिम, १४ व्या रस्त्यावर 'लाव्ही' इमारतीत राणा दाम्पत्य यांचे घर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा वाचण्यास जाण्यासाठी हे दाम्पत्य मुंबईत आले तेव्हा याच इमारतीत उतरले होते. या इमारतीत तसेच काही घरांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिक बांधकाम करण्यात आले असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. पालिका नियमांचे उल्लंघन केले असल्याच्या तक्रारीवरून मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम ४८८ नुसार नोटीस पाठवली आहे. राणा हे तुरुंगात असल्याने पालिकेच्या पथकाने त्यांच्या घरावर नोटीस बजावली होती. राणा यांच्या घरी पालिकेचे पथक दोन वेळा जाऊन आले. मात्र, ते तुरुंगात असल्याने पालिकेच्या पथकाला त्यांच्या घरात जाता आले नव्हते.

नव्याने नोटीस - ९ मे ला राणा दाम्पत्य दिल्लीला रवाना होण्याच्या आधी पालिकेचे पथक त्यांच्या घरी पोहचले. त्यांनी घरात झालेल्या बांधकामाची माहिती घेतली. त्यात काही बेकायदेशीर बांधकाम झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे राणा दाम्पत्याला पालिकेने नोटीस बजावली. त्याला उत्तर देताना बेकायदेशीर बांधकाम झाले नसल्याचे राणा यांनी पालिकेला कळविले आहे. राणा यांच्या उत्तराने पालिकेचे समाधान झाले नसल्याने नव्याने नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील १५ दिवसांत बांधकाम पाडा नाहीतर आम्ही पाडू, अशी नोटीस पालिकेने राणा दाम्पत्याला दिली आहे. त्याला राणा यांनी न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर दिंडोशी न्यायालयाने राणा यांना दिलासा दिला आहे. पालिकेने नोटीस ( BMC Notice To Rana Home In Khar ) बजावल्यानंतर आता राणा दाम्पत्य आपले बेकायदा बांधकाम लवकरच नियमित करणार आहेत. दिंडोशी न्यायालयाने त्यांना एक महिन्याची मुदत दिली आहे.

राणा राहत असलेल्या इमारतीची तपासणी - राणा राहत असलेल्या इमारतीमधील रहिवाशांना पालिकेने नोटीस बजावली होती. आज ३० मे ला सकाळी ११.३० वाजता पालिकेच्या दोन अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरु केली. अडीच तास ही तपासणी सुरु होती. या तपासणीदरम्यान पालिका अधिकाऱ्यांनी फोटो आणि व्हिडिओ काढले आहेत. याद्वारे बेकायदेशीर बांधकाम झाले आहे का? याबाबत अहवाल तयार केला जाणार आहे. या अहवालानंतर पालिकेकडून संबंधितांना आपले बेकायदेशीर बांधकाम स्वत: तोडावे किंवा ते आम्ही तोडू, अशी नोटीस बजावली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हनुमान चालीसा प्रकरण - मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' या बंगल्यावर जाऊन हनुमान चालीसा पठण करू, असे आव्हान राणा दाम्पत्याने दिले होते. त्यानंतर मुंबईत दोन दिवस वातावरण तापले होते. या प्रकरणी राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली असून, ते बारा दिवस तुरुंगात होते. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला आहे. जामीन मिळाल्यावर राणा दाम्पत्यांनी मीडियाला बाईट दिली. विशेष म्हणजे, न्यायालयाने त्यांना मीडियाशी बोलू नये, अशी अट घातली होती. न्यायालयाने दिलेली अट पाळली नसल्याने राज्य सरकारने राणा दाम्पत्याचा जमीन रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर राणा यांना नोटीस पाठवून त्यांचे यावर म्हणणे मांडण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा -आमचे तीन आणि त्यांचे तीन उमेदवार ठरले तर घोडेबाजार होणारच नाही - देवेंद्र फडणवीस

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details