महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई महानगरपालिका करणार सोशल मिडियासाठी 6 कोटींचा खर्च - आपली BMC

सोशल मिडियाच्या माध्यमातून पालिकेच्या कामांची माहिती घराघरात पोहचवण्यासाठी तसेच नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी मुंबई पालिकेना केला आहे. या कामासाठी पालिका ६ कोटी रुपयांचा खर्च करणार असून असा खर्च करणारी मुंबई पालिका एकमेव ठरणार आहे.

मुंबई महानगरपालिका

By

Published : Aug 18, 2019, 9:32 PM IST

मुंबई - गेल्या काही वर्षांत स्मार्ट फोनचा वापर वाढला आहे. स्मार्ट फोनमुळे सोशल मिडिया घराघरात पोहचला आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या कामांची माहिती घराघरात पोहोचवता यावी तसेच नागरिकांकडून सोशल मिडियाद्वारे तक्रारी केल्या जात असल्याने त्या तक्रारी सोडवण्यासाठी पालिकेने सोशल मिडियाचा वापर सुरू केला आहे. या कामासाठी पालिका महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाला तीन वर्षांसाठी 6 कोटी रुपये अदा करणार आहे. सोशल मिडियावर इतका खर्च करणारी मुंबई महापालिका एकमेव ठरणार आहे.

गेल्या काही वर्षात संवाद साधण्यासाठी सोशल मिडिया हे प्रभावी माध्यम म्हणून पुढे आले आहे. सोशल मिडियाचा वापर करुन केंद्र आणि राज्य सरकारे आपली कामे नागरिकांपर्यंत पोहचवत असतात. मात्र जगातील सर्वात श्रीमंत असलेली मुंबई महानगरपालिका सोशल मिडियापासून दूरच राहिली होती. यामुळे गेल्या काही वर्षांत मुंबई महापालिकेवर टिकाही झाली होती. त्यानंतर पालिकेने आपले वेबसाईट आणि ऍप बनवून नागरिकांचा सहभाग वाढवण्यावर भर दिला आहे. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचता यावे तसेच नागरिकांच्या सोशल मिडियावरील तक्रारींची दखल घेता यावी, म्हणून महापालिकेने सर्व विभागांसाठी केंद्रीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकसित केला आहे.

माहिती तंत्रज्ञान सल्लागार मेसर्स केपीएमजी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार व महाआयटी यांच्या मार्फत ३५ आयटी ऑफीस सहायक व सोशल मीडिया तज्ज्ञ आदी मनुष्यबळ सेवा घेण्यासाठी २७ जून २०१९ मध्ये करार केला आहे. १६ जुलै २०१९ ते १५ जुलै २०२२ पर्यंत ही मनुष्यबळाची सेवा घेऊन सोशल मिडिया प्लॅटफॉर्मची देखभाल केली जाणार आहे. यासाठी महाआयटीला ५ कोटी ७९ लाख ९४ हजार रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. पालिकेच्या सात विभागीय कार्यालयांसाठी २१, आपत्ती व्यवस्थापन विभागात ३, जनसंपर्क विभागात १, रस्ते विभागात १, उद्यान विभागात १, पूल विभागात १, आरोग्य विभागात १ तसेच घनकचरा विभागात १ नियुक्ती करण्यात आली आहे.

पालिकेचे प्रयत्न -
मुंबई महापालिकेने नागरिकांना सेवा सुविधांची माहिती देण्यासाठी तसेच नागरिकांना आपले कर भरता यावेत म्हणून महापालिकेने www.portal.mcgm.gov.in वेब पोर्टल सुरू केले आहे. पालिकेच्या सोयी सुविधा नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी तसेच तक्रारींसाठी "एमसीजीएसएम २४ बाय ७" हे मोबाईल अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. याबरोबरच महापालिकेचे ‘माझी Mumbai, आपली BMC’ @mybmc या नावाने ट्विटर अकाऊंट सुरू केले आहे. याद्वारे विविध विभाग कार्यालयांची माहिती, अपडेट्स आणि कार्यक्रम नागरिकांना उपलब्ध करून दिले जात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details