मुंबई -महानगरपालिकेच्या भांडूप येथील सावित्रीबाई फुले प्रसुतिगृहामधील एनआयसीयू मध्ये उपचार घेत असलेल्या चार बालकांचा सेप्टिक इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षा राजुल पटेल यांनी पीडित पालकांसमोर वादग्रस्त विधान केले. त्यामुळे, पालक संतप्त झाले आहेत.
हेही वाचा -Vanchit Bahujan Aghadi Morcha : ओबीसी आरक्षणासाठी 'वंचित'चा विधान भवनावर मोर्चा
सावित्रीबाई फुले रुग्णालयाला भेट दिल्यानंतर राजुल पटेल यांनी, तुम्ही आम्हाला विचारून आपल्या मुलांना रुग्णालयात दाखल केले का? असे म्हणत पालकांना दरडावले आहे. पीडित पालकांच्या प्रश्नांना उत्तर देता देता राजुल पटेल यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी सदर विधान केले. त्यांच्या या कृत्यामुळे पालक चांगलेच संतप्त झाले आहेत.
गोरेगावच्या प्रमोद मोरे यांच्या नवजात शिशूला भांडुपच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील एनआयसीयू मध्ये 15 तारखेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल अचानक त्यांच्या नवजात शिशूची प्रकृती बिघडली असल्याचे त्यांना सांगण्यात आले आणि उपचारादरम्यान हे बालक दगावले. डॉक्टरांनी जर वेळीच माहिती दिली असती तर, कदाचित आम्ही आमच्या बाळाला वाचवू शकलो असतो आणि इतरही मुलांना वाचवू शकलो असतो, अशी प्रतिक्रिया प्रमोद मोरे यांनी दिली.