मुंबई- मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी साचते. यामुळे मुंबईची तुंबई होते. मुंबईची तुंबई झाली की वाहतूक ठप्प होऊन मुंबई थांबते. यामुळे पालिकेवर टीका होत आली आहे. यासाठी पालिकेने नालेसफाई सोबतच इतर उपाययोजनांवर लक्ष दिले आहे. यामुळे पाणी साचणार नाही आणि मुंबई थांबणार नाही, असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबईची तुंबई -मुंबईत गेल्या काही वर्षांत पावसाचे प्रमाण वाढले आहे. जून ते सप्टेबर, असे चार महिने पावसाचे असले तरी काही दिवसात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडतो. यामुळे समुद्रात पाणी जाण्याच्या मार्गावर ताण येऊन पाणी शहरात दादर, हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, सायन आदी भागात पाणी साचते. पाणी साचल्याने मुंबईची तुंबई होऊन वाहतूक ठप्प होऊन शहरातील सर्व व्यवहार बंद होऊन मुंबई ठप्प होते.
नालेसफाईची कामे सुरू -मुंबईची तुंबई होऊ नये, मुंबई ठप्प होऊ नये यासाठी पालिकेने नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. ३४० किलोमीटरच्या नालेसफाईसाठी १६० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पावसाळ्याआधी ७५ टक्के गाळ तीन टप्प्यात काढला जाणार आहे. ५० टक्के गाळ मे महिन्याच्या सुरुवातीला काढला जाणार आहे. जे कंत्राटदार मे महिन्याच्या सुरुवातीला ५० टक्के गाळ काढणार नाहीत, त्यांना पुढील दोन टप्प्याचे काम दिले जाणार नाही. ते काम इतर कंत्राटदारांकडून करून घेतले जाणार आहे. नालेसफाई आठ तास केली जात होती. त्यात वेग येण्यासाठी सोळा तास म्हणजेच दोन शिफ्टमध्ये करण्याचे आणि दुप्पट मशिनरी वापरण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी कंत्राटदारांना दिले आहे.
४०० ठिकाणी पंप -मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी साचले की ते उपसा करून समुद्रात सोडले जाते. त्यासाठी पालिका मोठ्या संख्येने पंप लावते. याआधी मुंबईत २५० पंप लावले जात होते. गेल्या काही वर्षात ही संख्या वाढवून ३०० पंप लावण्यात येत आहेत. यंदा पंपाची संख्या वाढवण्यात आली असून ४०० पंप लावले जाणार आहेत. यासाठी पालिका ८० ते ९० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.