मुंबई - भांडुप येथील ड्रीम्स माॅलला लागलेल्या आगीत याच मॉलमधील सनराईज हॉस्पिटलमधील ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेला तब्बल सवा महिना झाला तरी त्याबाबतचा अहवाल पालिका प्रशासनाने जाहीर केलेला नाही. यावरून बुधवारी स्थायी समितीत गदारोळ झाला. आगीचे कारण आणि यामागचे गुन्हेगार कोण, त्यांच्यावर काय कारवाई केली, हे जाहीर का करत नाही, असा सवाल सर्व पक्षीय नगरसेवकांनी केला. त्यावर एक आठवड्यात अहवाल जाहीर करू, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.
आगीत ११ रुग्णांचा मृत्यू -
भांडुप येथील ड्रीम माॅलमध्ये २६ मार्च रोजी आग लागली होती. या आगीत माॅलमधील सनराईज कोविड रुग्णालयातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला. या आगीचा अहवाल जाहीर करून संबंधितावर कारवाई करा अशी जोरदार मागणी केल्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आगीचा अहवाल समितीला सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र आगीला तब्बल ४० दिवस पूर्ण झाल्यानंतरही प्रशासनाने अहवाल जाहीर केलेला नाही. याचे तीव्र पडसाद बुधवारी स्थायी समितीत उमटले. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी यावर हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. इतकी भयंकर दुर्घटना घडूनही मुंबई महापालिका गंभीर नाही. ओसी रद्द केली म्हणून रुग्णालय व्यवस्थापन पालिकेच्या विरोधात न्यायालयात गेले आहे. तब्बल अकरा जणांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या या लोकांना तातडीने अटक व्हायला हवी होती. पालिका आयुक्त कुणाला घाबरून कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत, असा सवाल रवी राजा यांनी केला. तत्कालीन अग्निशमन दल प्रमुख प्रभात रहांगदळे यांच्या कार्यकाळात रुग्णालयाला अग्निशमन दलाने परवानगी दिली होती. त्यांच्याकडून निष्पक्ष चौकशी कशी होणार, असे राजा म्हणाले.
धनदांडग्यांना वेगळा न्याय -
भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना एक न्याय आणि धनदांडग्यांना दुसरा न्याय असे सनराईज आगीबाबत दिसते आहे, असा आरोप केला. विविध प्रकारच्या चुकांचा पाढा रुग्णालयाने सुरू ठेवला तरी अद्याप कुणावरही कारवाई झालेली नाही. माॅलचा मालक वाधवा हा धनदांडगा असल्याने अद्याप सुरक्षित असल्याचे शिंदे म्हणाले.
येत्या आठवड्यात अहवाल -
ड्रीम्स मॉलला लागलेल्या आगीत सनराईज हॉस्पिटलमधील ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या आगीच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यानी दिले होते. पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी आगीच्या चौकशीसाठी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त प्रभात रहांगदळे यांची नियुक्ती केली होती. रहांगदळे यांनी आगीची चौकशी सुरूही केली होती मात्र त्यांना कोरोना झाल्याने आगीचा अहवाल येण्यास उशीर झाला आहे. येत्या आठवडाभरात अहवाल जाहीर करण्यात येईल, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.