मुंबई -नवीन कोरोना स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर, २१ डिसेंबरपासून परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन केले जात आहे. मात्र सर्वच प्रवाशांना त्या हॉटेलचे भाडे परवडेल असे नाही. यासाठी ज्या प्रवाशांना हॉटेलचे भाडे परवडत नाही, त्यांना महापालिकेने भायखळ्याच्या कोरोना सेंटरमध्ये मोफत राहण्या-जेवण्याची व्यवस्था केली आहे. शिवाह या प्रवाशांची कोरोना चाचणीही मोफत केली जाणार आहे. आतापर्यंत अशा ४५० प्रवाशांची व्यवस्था करून पालिकेने आपली माणुसकी जपली आहे.
नवा कोरोना स्ट्रेन -
मुंबईत मार्च महिन्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला. तेव्हापासून आरोग्य विभाग कोरोनाला रोखण्याचे काम करत आहे. कोरोनाला रोखण्यात काही प्रमाणात यश आले असतानाच ब्रिटन आणि युकेमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आला आहे. या नव्या विषाणूमुळे ब्रिटन युकेमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर लंडन, युके येथून येणारी विमाने २३ डिसेंबरपासून बंद करण्यात आली आहेत. २१ ते २३ डिसेंबरदरम्यान मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांना हॉटेलमध्ये क्वारंटाइन करण्यात आले आहे.
४५० प्रवाशांनी घेतला लाभ -
ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, मध्य पूर्व आणि युरोप येथून आलेल्या प्रवाशांना कोरोना झालेला नाही, याची खात्री होईपर्यंत त्यांची व्यवस्था मुंबईतील हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. मात्र पालिकेने निवडलेल्या हॉटेलचा सात दिवसांचा खर्च काही प्रवाशांना परवडणारा नाही. त्यामुळे आपल्या राहण्याची व्यवस्था अन्य ठिकाणी करावी, अशी विनंती प्रवाशांनी पालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार भायखळा येथील कोरोना सेंटरमध्ये ४५० प्रवाशांची मोफत व्यवस्था मुंबई महापालिकेने केली आहे.
७५ प्रवाशांना डिस्चार्ज -
जम्बो सेंटरमध्ये नाश्ता व तीनवेळा मोफत जेवण दिले जाते. क्वारंटाइन करण्यात आलेल्या प्रवाशांनी सात दिवसांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर त्यांना घरी जाण्यास परवानगी दिली जाते. अशा आतापर्यंत ७५ हून अधिक प्रवाशांना डिस्चार्ज मिळाला आहे. मात्र, या केंद्रातील सर्व सेवा मोफत असून कोरोनाबाधित रुग्णांना मात्र येथे ठेवण्यात आलेले नाही. केवळ कोरोना संशयित व्यक्तींना येथे सात दिवस ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
हेही वाचा - रैनाने सोडले मौन, 'या' कारणासाठी आयपीएलमधून घेतली माघार