महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राजकीय लढाईत अधिकार्‍यांना ओढू नका - पालिका आयुक्तांचा मोहित कंबोजला सल्ला - bmc commissioner iqbalsingh chahal news

मोहित कंबोज मला बदनाम करण्यासाठी तथ्ये फिरवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे दुर्दैवी आहे. मी कंबोज यांना विनंती करतो की त्यांनी आपली राजकीय लढाई राजकीय पातळीवर लढावी आणि अधिकार्‍यांना यात ओढू नये. सत्याचा नेहमी विजय होईल, असे चहल यांनी म्हटले.

bmc commissioner iqbal chahal advises mohit kamboj dont drag officials into political battle
इक्बाल सिंग चहल

By

Published : Mar 26, 2022, 10:08 PM IST

मुंबई -भाजप नेते मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेऊन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या गैरव्यवहार प्रकरणी महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची आयकर विभागाने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. यावर राजकीय लढाई राजकीय पातळीवर लढावी आणि अधिकार्‍यांना यात ओढू नये, असा सल्ला इक्बाल सिंग चहल यांनी कंबोज यांना दिला आहे.

खोडसाळ आरोप करू नये -मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या गैरव्यवहार प्रकरणी महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची आयकर विभागाने चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली आहे. तसेच पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी परदेशात संपत्ती घेतली आहे. या बाबतची माहिती लवकरच आयकर विभागाला देणार असल्याचे भाजपचे मोहित कंबोज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावर पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी खुलासा केला आहे. मोहित कंबोज यांनी आज माझ्यावर केलेले आरोप निराधार असून मला वादात ओढण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या राजकीय लढ्यात ते मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे खरोखरच दुःखद आणि दुर्दैवी आहे. माझी यूएसएमध्ये एकही संपत्ती नाही. त्यांनी असे खोडसाळ आरोप करू नये, असे चहल यांनी म्हटले.

बदनाम करण्यासाठी आरोप -समीत ठक्कर यांनी 4 मार्च 2022 ला केलेल्या ट्विटमध्ये आयकर विभाग माझी वैयक्तिक चौकशी करण्यासाठी सज्ज असल्याचा दावा दुर्भावनापूर्ण, खोडसाळ आणि वस्तुस्थितीनुसार चुकीचा होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात त्वरित तक्रार दाखल करण्यात आली, असे आयुक्तांनी सांगितले. मोहित कंबोज यांनी दाखवलेली इन्कम टॅक्स (IT) विभागाची नोटीस ही यशवंत जाधव यांच्याशी संबंधित प्रकरणाबाबत 2018 पासून पालिकेकडून माहिती मिळविण्याची एक नियमित सूचना होती. ही केवळ माहितीची आंतर-विभागीय देवाणघेवाण आहे. या सूचना येतात आणि योग्य स्तरावर उत्तरे दिली जातात. हे मी कालच सांगितले होते. मोहित कंबोज मला बदनाम करण्यासाठी तथ्ये फिरवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे दुर्दैवी आहे. मी कंबोज यांना विनंती करतो की त्यांनी आपली राजकीय लढाई राजकीय पातळीवर लढावी आणि अधिकार्‍यांना यात ओढू नये. सत्याचा नेहमी विजय होईल, असे चहल यांनी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details