मुंबई -ब्रिटनमध्ये कोविडचा नवीन प्रकारचा विषाणू आढळून आला आहे. याचा प्रसार मुंबईमध्ये होऊ नये म्हणून मुंबईत विमानतळावर उतरणाऱ्या सर्व प्रवाशांचे स्क्रीनिंग करून त्यांना क्वारंटाईन केले जाईल. तसेच २३ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहॆ, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात फेब्रुवारी ते मार्च दरम्यान मुंबईत तब्बल दोन लाख प्रवासी बाहेरच्या देशातून आले होते. त्यांना क्वारंटाईन केले नव्हते. यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोना पसरला. मागे जी चूक झाली ती चूक पुन्हा होऊ देणार नाही असे पालिका आयुक्तांनी सांगितले.
हेही वाचा -BREAKING : राज्यात उद्यापासून नाईट कर्फ्यू लागू; मुख्यमंत्र्यांचा निर्णय
एक हजार प्रवासी मुंबईत येणार -
ब्रिटनमध्ये नवा व्हायरसचा प्रकार समोर आला आहे. याची दखल घेत केंद्र सरकारने २३ डिमेंबर पासून ब्रिटनमधील एकही विमान भारतात उतरवण्यास बंदी घातली आहे. मात्र त्यापूर्वी ब्रिटनमधून आज उद्या अशा दोन दिवसात पाच विमान येणार आहेत. त्यामधून एक हजार प्रवासी मुंबईत उतरतील. त्यांना पुढील १४ दिवस क्वारनटाईन केले जाईल. त्यासाठी बेस्टच्या बसेसने या प्रवाशांना हॉटेलमध्ये क्वारनटाईनसाठी पाठवण्यात येणार आहे. या प्रवाशांसाठी ताज हॉटेलमध्ये ४१० रुम, ट्रायडंटमध्ये ३०० रुम, मॅरिएटमध्ये ३०० ते ३५० रूम आणि बजेट हॉटेलवाले १००० असे एकूण २ हजार रूम राखीव ठेवण्यात आले आहेत असे आयुक्तांनी सांगितले. विमानतळावरील कर्मचाऱ्यांना पालिकेकडून मोफत पिपीई किट मोफत देण्यात येणार आहे तसेच क्वारंटाईनचा खर्च नियमाप्रमाणे प्रवाशांना करावा लागणार आहे. असेही त्यांनी सांगितले.