महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

तौक्ते वादळामुळे पडलेली झाडे अल्पावधीत हटवल्याचा पालिकेचा दावा  - कडक लॉकडाऊन

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत वाऱ्याने तब्बल ११४ किलोमीटर प्रती तासापेक्षा अधिक वेग गाठला होता. या वेगवान वाऱ्यांमुळे महानगरपालिका क्षेत्रात ८१२ झाडे तर १४५४ झाडांच्या फांदया अशा एकूण २२६६ झाडे आणि फांद्या पडल्या होत्या. ८१२ झाडांपैकी ५०४ झाडे ही खासगी क्षेत्रातील असून ३०८ झाडे ही सार्वजनिक परिसरातील आहेत.

तौक्ते चक्रीवादळ
तौक्ते चक्रीवादळ

By

Published : May 19, 2021, 9:18 PM IST

मुंबई- तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत वाऱ्याने तब्बल ११४ किलोमीटर प्रती तासापेक्षा अधिक वेग गाठला होता. या वेगवान वाऱ्यांमुळे महानगरपालिका क्षेत्रात ८१२ झाडे तर १४५४ झाडांच्या फांदया अशा एकूण २२६६ झाडे आणि फांद्या पडल्या होत्या. ८१२ झाडांपैकी ५०४ झाडे ही खासगी क्षेत्रातील असून ३०८ झाडे ही सार्वजनिक परिसरातील आहेत. ही झाडे अनेक ठिकाणी रस्त्यांवर व सार्वजनिक परिसरात पडली होती. ज्यामुळे वाहतुकीस अडथळा होण्याची शक्यता होती. महापालिकेच्या उद्यान विभागाने दिवसरात्र नियोजन व कार्यवाही करुन ही पडलेली झाडे अल्पावधीत हटवून रस्ते मोकळे केले आहेत, असा दावा मुंबई महापालिकेकडून करण्यात आला आहे. तसेच मुंबईमधील झाडांचे ऑडिट केले जाणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

७० टक्के विदेशी झाडे पडली
मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खासगी परिसरातील ५०४ व सार्वजनिक परिसरातील ३०८ यानुसार एकूण ८१२ झाडे पडली. यापैकी सुमारे ७० टक्के पडलेली झाडे ही विदेशी प्रजातींची आहेत. यामध्ये प्रामुख्याने सोनमोहर, गुलमोहर, गुळभेंडी, रेन-ट्री, रॉयल पाम (नॉटल पाम) इत्यादी झाडांच्या प्रजातींचा समावेश आहे. मुंबईमध्ये वादळादरम्यान पडलेली झाडे ही विदेशी असल्याने देशी झाडे लावावावीत असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

२२६६ झाडे, फांद्या पडल्या
१६ ते १८ मे या साधारणपणे ३ दिवसांच्या कालावधीत पडलेल्या ८१२ झाडांमध्ये २४९ झाडे ही शहर परिसरातील आहेत. तर २५६ झाडे ही पूर्व उपनगरातील असून उर्वरित ३०७ झाडे ही पश्चिम उपनगरातील आहेत. यापैकी ५४५ झाडे ही १६ व १७ मे रोजी पडली. तर २६७ झाडे ही १८ मे रोजी पडली आहेत. महानगरपालिका क्षेत्रातील ८१२ झाडे पडण्याव्यतिरिक्त वादळाच्या प्रभावामुळे १ हजार ४५४ झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना देखील या कालावधी दरम्यान घडल्या. यापैकी, ७९८ फांद्या या खासगी परिसरातील झाडांच्या होत्या. तर उर्वरित ६६६ फांद्या या सार्वजनिक परिसरातील होत्या.

झाडांचे ऑडिट केले जाणार
गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ३ जून ते ६ जून २०२० या कालावधी दरम्यान ३२३ झाडे पडली होती. ज्यापैकी २२१ झाडे ही खासगी परिसरातील होती. तर १०२ झाडे ही सार्वजनिक परिसरातील होती. तर ५ व ६ ऑगस्ट २०२० या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यानात महापालिका क्षेत्रात वेगवान वाऱ्यांमुळे ३५५ झाडे पडली होती. ज्यापैकी १७९ झाडे ही खासगी परिसरातील होती. तर १७६ झाडे ही सार्वजनिक परिसरातील होती. या पडलेल्या झाडांमध्ये देखील विदेशी झाडांचे प्रमाणे अधिक होते. या अनुषंगाने नवीन वृक्षारोपण करताना कोणती झाडे लावावीत, याबाबतच्या धोरणाचा अभ्यासपूर्ण पुनर्विचार करुन स्थानिक परिस्थितीनुसार झाडांची निवड करण्याबाबत धोरण ठरविण्याचा विचार करण्यात येईल. तसेच झाडांचे ऑडिट करण्यात येईल, असेही उद्यान विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा -आता RT-PCR टेस्टसाठी स्वॅब घेणे होणार अधिक सोपे; 'निरी'च्या वैज्ञानिकांचा शोध

ABOUT THE AUTHOR

...view details