मुंबई- मुंबई महापालिकेच्या अनेक रस्त्यांवर फेरीवाले अनधिकृतपणे आपले व्यवसाय लावतात. यामुळे रस्ते आणि पदपथावरून नागरिकांना चालण्यास त्रास होतो. पालिकेचा मरिन लाईन्स ( Marine Lines ) परिसरात असलेल्या सी विभाग कार्यालयाच्या हद्दीतील दवा बाजार परिसरात विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात ( BMC Action on Hawkers ) आली. यामुळे दवाबाजारातील रस्ते आणि पदपथ फेरीवाला मुक्त झाले आहेत.
BMC Action on Hawkers : फेरीवाल्यांवर मुंबई महापालिकेची धडक कारवाई - मरिन लाईन्स परिसर
मुंबई महापालिकेच्या अनेक रस्त्यांवर फेरीवाले अनधिकृतपणे आपले व्यवसाय लावतात. यामुळे रस्ते आणि पदपथावरून नागरिकांना चालण्यास त्रास होतो. पालिकेचा मरिन लाईन्स ( Marine Lines ) परिसरात असलेल्या सी विभाग कार्यालयाच्या हद्दीतील दवा बाजार परिसरात विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली.
![BMC Action on Hawkers : फेरीवाल्यांवर मुंबई महापालिकेची धडक कारवाई कारवाई करतानाचे छायाचित्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-09:15:14:1643298314-mh-mum-action-on-feriwala-7205149-27012022205115-2701f-1643296875-711.jpg)
फेरीवाल्यांवर कारवाई -मुंबई महापालिकेच्या सी विभाग कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या दवा बाजार परिसरात अरुंद रस्ते आहेत. या अरुंद रस्त्यांवर वाहने पार्क केली जातात. रस्ते आणि पदपथावर फेरीवाले आपले धंदे लावतात. यामुळे रस्त्यावरून चालताना येथील नागरिकांना त्रास होतो. याबाबत ज्येष्ठ नागरिक, दक्ष लोकप्रतिनिधी यांनी सी विभाग कार्यालयाकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी फेरीवाल्यांवर कारवाईचे आदेश दिले. या आदेशानुसार दवाबाजार, पांजरपोल, काळबादेवीरोड, भुलेश्वर,सी.पी.टॅंक या विभागातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत येथील सर्व रस्ते फेरीवाले मुक्त करण्यात आले. या कारवाईनंतर या विभागातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या कारवाईसाठी पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे वरिष्ठ निरीक्षक संजय गोसावी तसेच तानाजी मोरे, निरीक्षक भय्यासाहेब पारधी, अमोल महाजन, जगदीश झोरे आणि रतीलाल झोरे यांच्या अधिपत्याखाली २४ पालिका कामगारांकडून ही कारवाई करण्यात आली.
कर्मचाऱ्यांवर फेरीवाल्यांकडून हल्ले -पालिकेच्या सी विभाग कार्यालयाच्या हद्दीत फेरीवाल्यांवर कारवाई केल्यास विरोध केला जातो. पालिका अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई दरम्यान हल्ले केले जातात. या विभागात कारवाई वेळी अनेकदा पालिका कर्मचाऱ्यांवर फेरीवाल्यांकडून हल्ले करण्यात आले आहेत. याचा विचार करून पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच या विभागात फेरीवाल्यांवर जरब बसविण्यासाठी काही दिवस अतिक्रमण निर्मूलन विभागाची एखादी गाडी उभी केली जावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.