मुंबई - मुंबईत दरवर्षी कमी दिवसात जास्त प्रमाणात पाऊस ( Mumbai Rain ) पडतो. यामुळे शहरात पाणी साचण्याच्या घटना घडतात. मुंबईची तुंबई होते. मात्र, यंदा गेले आठवडाभर मुसळधार पाऊस पडत आहे. रोज १०० ते १५० मिलीमीटर पावसाची नोंद होत आहे. त्यानंतरही 'मुंबईची तुंबई' झालेली नाही. मुंबई महानगरपालिकेने गेल्या काही वर्षात केलेल्या उपाययोजनांमुळे मुंबईची तुंबई झालेली ( Pumping Station Several Areas Help Drainage Of Water In Mumbai ) नाही. विशेष म्हणजे या कामाची स्तुती राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी केली आहे.
'या' केल्या जात आहेत उपायोजना - मुंबई समुद्राच्या किनारी आहे. मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे मुसळधार पाऊस पडल्यास पाणी साचते. २६ जुलै २००५ मध्ये ९९४ मिलीमीटर पाऊस एकाच दिवशी पडल्याने १४९३ नागरिकांचा मृत्यू झाला होता. मुंबई ठप्प झाल्याने सुमारे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून राज्य सरकार आणि पालिकेने मिठी नदीचे रुंदीकरण, सौंदर्यीकरण, नदी पात्रातील बांधकामे हटवणे, मुंबईमधील पडणाऱ्या पावसाचे पाणी समुद्रात आणि खाडीत सोडण्यासाठी नाल्यांची रुंदी आणि खोली वाढवणे, पावसाचे पाणी अधिक गतीने समुद्रात सोडता यावे म्हणून पंपिंग स्टेशन उभारणे आदी प्रकल्प हाती घेतले आहेत. मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, सुशोभीकरण याचे काम आजही सुरु आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईत हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, सायन, अंधेरी मिलन सब वे आदी ठिकाणी पावसाचे पाणी १० ते १५ तासांहून अधिक साचलेले असायचे. गेल्या एक दोन वर्षात हा कालावधी कमी झाला आहे. या वर्षी गेले आठवडाभर मुसळधार पाऊस पडत आहे. त्यानंतरही हिंदमाता, किंग सर्कल आदी ठिकाणी जास्त वेळ पाणी साचलेले नाही.
६ पम्पिंग स्टेशन सुरु -ब्रिमस्टोवॅड अहवाल आणि चितळे समितीच्या शिफारशीनुसार मुंबईमध्ये एकूण आठ ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करणारी पंपिंग स्टेशन बनवण्याचा निर्णय घेतला होता. या आठपैकी हाजीअली, ईला, लव्ह ग्रोव्ह, क्लीव्हलँड, ब्रिटानिया आणि गझदरबंध या सहा उदंचन केंद्रांची कामे पूर्ण होऊन ती कार्यान्वित झाली आहेत. शहरात साचलेले पाणी पर्जन्य जल वाहिन्यांद्वारे या पंपिंग स्टेशनमध्ये आणले जाते. त्यानंतर समुद्राला भरती नसताना हे पाणी समुद्रात सोडले जाते. समुद्राला भरती असताना पंपिंग स्टेशनचे गेट बंद केले जातात. भरती ओसरल्यावर हे पाणी समुद्रात सोडण्याचे काम या पंपिंग स्टेशन द्वारे केले जाते.
भूमिगत टाक्या -पावसाळ्यात विशेष करून दादर हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, सायन, अंधेरी मिलन सब वे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. या ठिकाणी काही वर्षांपूर्वी पाणी साचल्यास ते १० ते १५ तासाहून अधिक वेळ साचून राहत होते. पालिकेने मुंबईमधील पर्जन्य जल वाहिन्यांची क्षमता २५ मिलीमीटर होती ती ५० मिलीमीटर इतकी केली आहे. हिंदमाता परिसरात प्रमोद महाजन गार्डन व झेवीयर्स गार्डन या दोन ठिकाणी मोठ्या भूमीगत टाक्या बनवण्यात आल्या आहेत. या टाक्यांमध्ये ३ कोटी लिटर पाणी साठा होऊ शकतो. हिंदमाता येथील पावसाचे पाणी या टाकीत साचल्यानंतर पंपाच्या साहाय्याने ते समुद्रात सोडण्यात येत आहे. परळ येथे दोन रॅम्प उभारण्यात येणार आहेत. त्यामुळं यंदा हिंदमाता येथे पावसाचे पाणी जास्त वेळ साचून राहिलेले नाही. मिलन सब वे जवळही अशाच प्रकारच्या भूमिगत टाक्या उभारल्या जात आहेत.