मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद रणपिसे यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपचे उमेदवार संजय केणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांकडे विधानभवन येथे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर उपस्थित होते.
भाजपच्या संजय केणेकरांचा विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल कोण आहेत संजय केणेकर?संजय केणेकर हे भाजपचा मराठवाड्यातील आक्रमक असा चेहरा आहे. भाजप विद्यार्थी संघटनेपासून युवा मोर्चा, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष, २० वर्षे नगरसेवक, उपमहापौर, गटनेता, कामगार आघाडी सरचिटणीस, कामगार आघाडी प्रदेश अध्यक्ष, म्हाडा सभापती, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष या विविध पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. मराठवाड्यातील आक्रमक असा कार्यकर्ता असल्याने पक्षश्रेष्ठींनी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे.काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर विधानपरिषदेची जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी जुलै २०२४ पर्यंत विधान परिषदेची मुदत असून, येत्या २९ नोव्हेंबरला विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी १६ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली असल्याने भाजपतर्फे संजय केणेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारीकाँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर वर्णी लागेल अशी चर्चा होती. मात्र, प्रज्ञा सातव यांना राज्यसभेचं तिकीट नाकारण्यात आलं. त्यावेळी त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांचं निधन झालं. त्यामुळे रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे महासचिव मुकूल वासनिक यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेचं तिकीट देण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे.