मुंबई -मुंबईत पुन्हा लॉकडाऊन करायला विविध राजकीय पक्षांकडून विरोध होत आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अनेकवेळा लॉकडाऊनचे संकेत देण्यात आले आहेत. मुंबईसह राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत, मात्र तरी देखील कोरोना रुग्ण वाढत असल्याने, पुढील काळात धार्मिक स्थळे आणि लोकल बंद होण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी आक्षेप घेतला आहे. आम्ही धार्मिक स्थळे बंद होऊ देणार नाहीत, मंदिरे बंद झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला आहे.
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईत पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईत ज्या पद्धतीने निर्बंध लावण्यात आले होते, तसेच निर्बंध आताही लागण्याची शक्यता आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत विधान केलं आहे. मुंबईत कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे मुंबईत मॉल, मंदिर आणि गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लावले जाऊ शकतात, आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्या असे मुंबईच्या महापौरांनी म्हटले आहे. मात्र दुसरीकडे भाजपने या लॉकडाऊनला विरोध केला आहे.